भुसावळ (प्रतिनिधी ) : शहरातील एका शाळेत शिकणार्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा भाऊ असल्याचे शाळेत खोटू सांगून मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी तौसीफ जहाबाद तडवी (22, रा.पाल, ता.रावेर) याच्याविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला यावल परिसरात सापळा रचून अटक करण्यात आली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता 18 ऑगस्टपर्यंत पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलगी एका तालुक्यातील रहिवासी आहे व ती भुसावळात शिक्षण घेते. गुरुवार, 7 ऑगस्ट रोजी आरोपी तडवी शाळेत आला व त्याने मुख्याध्यापकांना लेखी अर्ज देत स्वतःला मुलीचा भाऊ असल्याचे खोटे सांगितले. मुख्याध्यापकांची दिशाभूल करून त्याने मुलीला सोबत घेतले व मुंबई, चोपडा आणि जळगाव येथे नेले.

तक्रारीनुसार, 9 ऑगस्ट रोजी जळगाव शहरातील एका हॉटेलमध्ये आरोपीने मुलीवर अत्याचार केला. घटनेनंतर पीडितेच्या वडिलांनी तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार 12 ऑगस्ट रोजी रात्री आरोपीविरुद्ध अपहरण व लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याच्या गंभीरतेचा विचार करून पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख, प्रशांत सोनार, भूषण चौधरी आदींच्या पथकाने यावल परिसरात रात्री सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतले. 13 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला 18 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.


