गावठी कट्टा व पाच जिवंत काडतुससह फरार गुन्हेगार अटकेत ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ;

जळगाव – स्थानिक गुन्हे शाखा, जळगावच्या पथकाने वरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत गावठी कट्टा व पाच जिवंत काडतुसेसह एक फरार गुन्हेगार अटक केला. या कारवाईमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. श्री महेश्वर रेड्डी यांच्या निर्देशानुसार व अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, तसेच स्थानीक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे श्रीकृष्ण देशमुख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पो.उ.नि. रवि नरवाडे, पोहेकॉ गोपाळ गव्हाळे, पो.अं. रविंद्र चौधरी यांच्या पथकाने फुलगाव फाट्याजवळ सापळा रचत केशव उर्फ सोनु सुनिल भालेराव (वय २२, रा. सिद्धेश्वर नगर, वरणगाव) याला अटक केली. त्याच्याकडून अंदाजे ₹२७,५०० किमतीचा गावठी कट्टा व पाच पितळी जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस क्र. १४८/२०२५ नुसार भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस चौकशीत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली की, अटक करण्यात आलेला आरोपी केशव भालेराव याच्यावर पूर्वी देखील वरणगाव पो.स्टे गु.र.न. २०/२०२५ अन्वये हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होता व तो मागील सहा महिन्यांपासून फरार होता.

ही उल्लेखनीय कारवाई स्थागुशा, जळगावचे अधिकारी व अंमलदार श्रीकृष्ण देशमुख, रवि नरवाडे, गोपाळ गव्हाळे, व रविंद्र चौधरी यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली.