१९७८ पासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांना कायमस्वरूपी मालकी हक्क द्या-नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन ;

हनुमान नगर व गणेशपुरीतील रहिवाशांना दिलासा देण्याची मागणी

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील प्रभाग क्रमांक २२ मधील हनुमान नगर आणि गणेशपुरी परिसरात सन १९७८ पासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांना त्याच जागेवर कायमस्वरूपी स्थायिक करून कायदेशीर मालकी हक्क मिळवून द्यावेत, अशी मागणी नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. रहिवाशांना स्वतंत्र ७/१२ उतारा, अकृषिक (NA) मान्यता देण्यासह शाळा व खेळाच्या मैदानाचे आरक्षण रिक्त फायनल प्लॉटवर स्थलांतरित करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, मौजे भुसावळ येथील सर्व्हे क्रमांक १६७/१/१/१ ही जागा नगररचना टी.पी. स्कीम क्रमांक १ अंतर्गत शाळा व प्ले ग्राउंड या सार्वजनिक प्रयोजनासाठी आरक्षित आहे. मात्र, या जागेवर सन १९७८ पासून मोठ्या प्रमाणात नागरिकांची वस्ती असून अनेक कुटुंबे घरे बांधून वास्तव्यास आहेत. गेल्या अनेक दशकांपासून या परिसरातील नागरिकांचे संसार, सामाजिक संबंध आणि दैनंदिन जीवन याच जागेशी जोडलेले आहे.

गणेशपुरी व हनुमान नगर परिसरातील रहिवाशांना टी.पी. स्कीम क्रमांक १ अंतर्गत पर्यायी जागा म्हणून फायनल प्लॉट देण्यात आले होते. तथापि, संबंधित रहिवासी आजपर्यंत या पर्यायी जागांवर स्थलांतरित झालेले नसून मूळ जागेवरच वास्तव्यास आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या सन २०११ पूर्वीच्या अतिक्रमण व निवासी जागा नियमित करण्यासंदर्भातील लागू शासन निर्णयांचा विचार करून पात्र रहिवाशांना न्याय द्यावा, अशी मागणी ठाकूर यांनी केली आहे.

स्वतंत्र ७/१२ उतारा आणि NA मान्यता द्या

सर्व्हे क्रमांक १६७/१/१/१ मधील सन १९७८ पासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण व चौकशी करून पात्र रहिवाशांना त्याच ठिकाणी कायमस्वरूपी स्थायिक करण्यासाठी नियमानुसार कार्यवाही करावी. प्रत्येक घराच्या जागेचे स्वतंत्र मोजमाप करून संबंधितांच्या नावाने स्वतंत्र ७/१२ उतारा तयार करण्यासाठी महसूल विभागाकडे प्रस्ताव पाठवावा. तसेच जागा अकृषिक (NA) करून नागरिकांना कायदेशीर हक्काची कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, असे निवेदनात म्हटले आहे.

रिक्त फायनल प्लॉटवर आरक्षण स्थलांतरित करण्याची मागणी

हनुमान नगर येथील टी.पी. स्कीम क्रमांक १ मधील फायनल प्लॉट क्रमांक ९/४७, ९/४९, ९/५८, ९/५९, ९/६०, ९/६१, ९/४६ आणि ९/५५ हे प्लॉट आजपर्यंत रिक्त असल्याची प्रत्यक्ष पाहणी करून खात्री करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

संबंधित प्लॉट रिक्त असल्याचे आणि नियमानुसार आरक्षण स्थलांतरित करणे शक्य असल्याचे आढळल्यास सर्व्हे क्रमांक १६७/१/१/१ मधील शाळा व प्ले ग्राउंडचे आरक्षण या रिक्त जागांवर स्थलांतरित करण्यासाठी नगररचना विभागामार्फत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून शासनाची मान्यता घ्यावी, अशी भूमिका नगरसेवक ठाकूर यांनी मांडली आहे.

तीन विभागांच्या संयुक्त पाहणीतून तोडगा काढण्याचे आवाहन

या प्रकरणी नगरपरिषद, नगररचना विभाग आणि महसूल विभाग यांनी संयुक्तपणे प्रत्यक्ष पाहणी व चौकशी करून नागरिकांच्या हिताचा निर्णय घ्यावा. सन १९७८ पासून वास्तव्यास असलेल्या पात्र कुटुंबांना त्यांच्या घरांच्या जागेबाबत कायदेशीर हक्क मिळवून देण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले आहे.

लोकप्रतिनिधी म्हणून प्रभागातील नागरिकांच्या न्याय्य हक्कांचा प्रश्न आपण प्रशासनासमोर मांडला असून मुख्याधिकाऱ्यांनी या गंभीर विषयाची सहानुभूतीपूर्वक दखल घेऊन संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाहीचे आदेश द्यावेत, अशी मागणी नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांनी केली आहे.