भुसावळ (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील संभाव्य दुष्काळी परिस्थिती आणि भविष्यात उद्भवणारी पाणीटंचाई लक्षात घेता भुसावळ शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आतापासूनच उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. भुसावळ नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेना शिंदे गटनेते तथा नगरसेवक बबलू बऱ्हाटे यांनी शहरातील सर्व विहिरींवर विद्युत पंप बसविण्याची महत्त्वपूर्ण सूचना मांडली. भविष्यात शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये तसेच उपलब्ध जलस्रोतांचा प्रभावी वापर करता यावा, हा या सूचनेमागील मुख्य उद्देश आहे. नगरसेवक बबलू बऱ्हाटे यांनी मांडलेल्या या सूचनेला मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षा शैलजा नारखेडे यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे. त्यामुळे शहरातील पाणीप्रश्नावर संभाव्य संकट येण्यापूर्वीच उपाययोजना करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, यासाठी शहरातील विहिरींचा पर्यायी जलस्रोत म्हणून उपयोग करण्याची ही संकल्पना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.


