भुसावळ (प्रतिनिधी ) - आधुनिक युगात उत्तम दर्जाचे शिक्षण मिळणे अत्यंत आवश्यक आहे परंतु शिक्षणाबरोबरच आपल्या प्राचीन सनातन संस्कृतीचे संस्कार विद्यार्थ्यांना मिळणे ही काळाची गरज आहे. माती ओली असताना जसा तिला हवा तसा आकार दिला जातो तसेच मुला मुलींना बालवयातच संस्कार दिले जाऊ शकतात आणि हे कार्य 90 वर्षाची उज्वल शैक्षणिक परंपरा असलेली संस्था श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ अतिशय उत्कृष्ट रित्या करू शकते असा मला विश्वास वाटतो. असे प्रतिपादन स्वामीनारायण मंदिराचे प्रमुख शास्त्री धर्मस्वरूपदास जी महाराज यांनी केले निमित्त होते श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित क्रिष्णा किड्स अकॅडमीच्या उद्घाटन सोहळ्याचे.
शिक्षण क्षेत्रात मागील नऊ दशकापासून अग्रेसर असलेल्या संस्थेने बालकांना इंग्रजी शिक्षणा बरोबरच संस्कार देण्याच्या हेतूने तुकाराम नगर येथील स्वामीनारायण मंदिराजवळ ही अकॅडमी सुरू केली आहे या शाळेचा उद्घाटन समारंभ मंगळवार रोजी शाळेच्या परिसरात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर उद्घाटक म्हणून शास्त्री धर्मस्वरूप दासजी महाराज, प्रमुख अतिथी सौ. रजनीताई सावकारे, अध्यक्षा, प्रतिष्ठा महिला मंडळ, डॉ. विजयजी सोनी जिल्हा संघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, स्वामी मुक्तस्वरूप दास, स्वामी माधव स्वरूप दास ,संस्था कार्यकारणी सदस्य श्री श्रीधर खनके, श्री भागवत वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते..
सरस्वती पूजन तसेच श्रीफळ वाढवून शास्त्रीजींच्या हस्ते शाळेचे उद्घाटन करण्यात आले उद्घाटनानंतरच्या मनोगतात सौ. रजनीताई सावकारे यांनी संस्थेच्या इतर शाळांप्रमाणे या शाळेत सुद्धा संस्कारक्षम असे उत्तम शिक्षण दिले जाईल याबाबत शंका नसल्याचे सांगितले तसेच शाळेच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष श्री सोनुभाऊ मांडे यांनी केले ,प्रमुख पाहुण्यांचा परिचय पर्यवेक्षक श्री नारायण घोडके सर यांनी करून दिला ,आभार प्रदर्शन पर्यवेक्षक श्री संजीव पाटील सर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सोनाली वासकर यांनी केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालकांनी व बाल गोपाळानी गर्दी केली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी सहकार्य केले.



