भुसावळ (प्रतिनिधी ) : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड रेल्वे स्थानकावर सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ आयुक्त चित्रेश जोशी यांनी नुकतीच पाहणी केली. या वेळी स्थानकावरील आरपीएफ निरीक्षक आणि कर्मचार्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली.

सुरक्षा उपाययोजना राबवण्यासाठी नियोजनपूर्वक प्रस्ताव तयार करून तो आयुक्तांकडे सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. रेल्वे स्थानकावरील सर्व चोरमार्ग तत्काळ बंद करण्याचे तसेच अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. प्लॅटफॉर्मवरून बाहेर पडण्यासाठी पर्यायी मार्ग आहेत का, याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता, संभाव्य धोक्यांना प्रतिबंध करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. या वर्षीचा कुंभमेळा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडणार आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही त्रृटी राहणार नाही, असेही वरिष्ठ आयुक्त जोशी यांनी स्पष्ट केले.


