मंत्री गुलाबराव पाटील यांचा असाही उत्साह, विद्यार्थ्यांना बैलगाडीत बसवून शाळेपर्यंत सोडले ;


जळगाव – गुलाबराव पाटील यांनी पाळधी (ता. धरणगाव) येथे विद्यार्थ्यांना सजविलेल्या बैलगाडीत बसवून चक्क शाळेपर्यंत नेऊन सोडले, जिल्हाभरात शाळेच्या पहिल्या दिवशी उत्साह आणि जल्लोष दिसून आला. जिल्हा परिषदेसह महानगरपालिका व नगर परिषदांच्या शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ सोमवारी करण्यात आला. यानिमित्त ठिकठिकाणच्या शाळांमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून व पुष्पगुच्छ देऊन, टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाळधी (ता. धरणगाव) येथे विद्यार्थ्यांना सजविलेल्या बैलगाडीत बसवून चक्क शाळेपर्यंत नेऊन सोडले. जिल्हाभरात शाळेच्या पहिल्या दिवशी उत्साह आणि जल्लोष दिसून आला.

खासदार स्मिता वाघ, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार अमोल पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, शिक्षक, पालक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनीही या उपक्रमात सक्रीय सहभाग नोंदवत शाळेचा पहिला दिवस जल्लोषात साजरा केला. खासदार वाघ यांनी अमळनेर तालुक्यातील जवखेडे येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. गणवेश, पाठ्यपुस्तकांचे वाटप आणि वृक्षारोपणाच्या उपक्रमात सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. आमदार सोनवणे यांच्या उपस्थितीत चोपडा तालुक्यातील अडावद येथे तर आमदार पाटील यांच्या उपस्थितीत पारोळा तालुक्यातील कन्हेरे येथे विद्यार्थ्यांचे स्वागत करून गणवेश व पाठ्यपुस्तके वितरीत करण्यात आली. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी जामनेर तालुक्यातील भराडी शाळेला आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी जळगाव तालुक्यातील नांद्रा बुद्रुक व पिलखेडे येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्पांनी स्वागत केले. या प्रसंगी ग्रंथ दिंडीचे आयोजनही करण्यात आले.

याशिवाय, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी शिरसोली येथे, नगर प्रशासनाचे सहायक आयुक्त जनार्दन पवार यांनी वडगाव लांबे येथे, तहसीलदार नीता लबडे यांनी भुसावळला, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांनी चोपड्याला, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार यांनी जिराळीला, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी विदगावला, नायब तहसीलदार रविंद्र उगले यांनी महिंदळेला, मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांनी गिरडला, निवासी नायब तहसीलदार सुधीर सोनवणे यांनी भडगावला, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी गारखेड्याला आणि तहसीलदार विजय बनसोड यांनी पाचोऱ्याला भेट देऊन विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी स्वागत केले.