वीज कोसळल्याने भावंडांसह चौघांचा मृत्यू –

सिल्लोड। – वीज पडून दोन सख्ख्या भावांसह एका महिलेचा व तरुण शेतकर्‍याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील सारोळा शिवारात घडली. या घटनेत चार जनावरेही दगावली. या घटनेने तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास तालुक्यात विजांच्या प्रचंड कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. याच दरम्यान, सरोळा शिवारातील गट क्रमांक 294 मध्ये वीज कोसळून यश राजू काकडे (14) आणि रोहित राजू काकडे (21) या दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडली तेव्हा ते शेतात काम करत असल्याची प्राथमिक माहिती आहे.

याच सुमारास मोढा बुद्रुक शिवारातील गट क्रमांक 266 मध्येही वीज पडून रंजना बापुराव शिंदे (50) या महिलेलाही आपले प्राण गमवावे लागले. पिंपळदरी येथील शेतकरी शिवराज सतीश गव्हाणे (28) या तरूण शेतकर्‍याचा मृत्यू झाला. तर त्याचा भाऊ जिवन सतीश गव्हाणे वय 20 वर्षे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

या नैसर्गिक आपत्तीचा फटका केवळ मानवी जीवनालाच नाही, तर जनावरांनाही बसला. मांडणा येथील गट क्रमांक 295 मध्ये वीज पडून ज्ञानेश्वर माणिकराव लोखंडे यांची तीन वासरे दगावली. तर अन्वी शिवारातील गट क्रमांक 139 मध्ये नारायण सांडू बांबर्डे यांची एक म्हैस देखील वीज पडून मृत्युमुखी पडली.