फुकट्या प्रवाशांकडून 12 कोटींचा दंड वसूल : निसार खान ‘सर्वोत्कृष्ट निरीक्षक’ –

भुसावळ फुकट्या रेल्वे प्रवाशांविरोधात रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने मोहिम राबवण्यात येते मात्र त्यानंतरही अनेक प्रवासी नियम डावलून रिझर्व्हेशन डब्यात प्रवास करतात तर काही विना तिकीट प्रवास करतात. अशा एकूण एक लाख 19 हजार प्रकरणात भुसावळ रेल्वे विभागाने नुसत्या मे महिन्यात 11 कोटी 18 लाखांचा दंड वसुल केला आहे. ही कामगिरी पार पडणार्‍यांमध्ये भुसावळ विभागात टीटीआय निसार खान हे सर्वोत्कृष्ट ठरले आहेत. त्यांचा भुसावळ डीआरएम ईती पाण्डेय यांनी विशेष सत्कार करीत त्यांच्याकडून अशाच पद्धत्तीने कामाची अपेक्षा व्यक्त केली.

फुकट्या प्रवाशांवर लक्ष केंद्रीत
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने तिकीटविना व अनियमित प्रवासावर नियंत्रण ठेवण्यासाठी तिकीट तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे यामुळे प्रवासात शिस्तीचा प्रसार व महसूल सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. वाणिज्य विभागाने आपल्या कर्मचार्‍यांच्या समर्पित प्रयत्नांद्वारे तिकीटविना व अनियमित प्रवासाविरुद्ध ठोस पावले उचलून प्रामाणिक प्रवाशांसाठी सुरक्षित आणि आरामदायक प्रवास सुनिश्चित केला आहे.

मे महिन्यात 43.22 टक्के महसुलात वाढ
भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक ईती पांडे यांच्या नेतृत्वाखाली मे 2025 मध्ये भुसावळ विभागाने एकूण 11.19 कोटींचा महसूल तिकीट तपासणीद्वारे मिळवला तर एक लाख 18 हजार प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. गत मे 2024 मध्ये 7.82 कोटींचा महसूल जमा झाला मात्र यंदा 43.22 टक्के वाढ नोंदवण्यात आली. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत तिकीट तपासणीद्वारे मिळवलेला एकत्रित महसूल 22.12 कोटींवर पोहोचला आहे.

भुसावळातील दोन कर्मचारी ठरले सर्वोत्कृष्ट तिकीट तपासणी
रेल्वेच्या यशस्वी कामगिरीमागे तिकीट तपासणी कर्मचार्‍यांची निष्ठा व परिश्रम कारणीभूत आहेत. एप्रिल व मे 2025 या दोन महिन्यांमध्ये दोन कर्मचार्‍यांनी विशेष कामगिरी करून संपूर्ण विभागात आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यात टीटीआय निसार खान हे भुसावळ विभागातील सर्वोत्कृष्ट तिकीट तपासणी कर्मचारी ठरले. एप्रिल 2025 मध्ये त्यांनी एक हजार 577 प्रकरणे नोंदवून 25 लाख 20 हजार 900 रुपयांचा महसूल जमा केला तर मे 2025 मध्ये एक हजार 597 प्रकरणांद्वारे 32 लाख तीन हजार 250 रुपयांचा महसूल वसूल केला. त्यांच्या अथक मेहनतीमुळे तिकीट तपासणी क्षेत्रात एक आदर्श उभा राहिला आहे.

दुसरे कर्मचारी व टीटीआय सी.पी.बडगे यांनी एप्रिल 2025 मध्ये 649 प्रकरणांतून 12 लाख 68 हजार 660 रुपयांचा महसूल मिळवला.
मे 2025 मध्ये 850 प्रकरणांद्वारे 18 लाख 52 हजार 400 रुपयांचा महसूल वसूल केला. त्यांचे कार्य हे महसूल संरक्षण व प्रवासी सुविधा यामध्ये अमेनीटी कर्मचार्‍यांचे वाढते योगदान अधोरेखित करणारे आहे.