तहसिलचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; स्ट्राँगरूमवरील पत्रे विक्रीची चौकशी व्हावी- केदारनाथ सानप


भुसावळ प्रतिनिधी ) – येथील तहसील कार्यालयातील निवडणूक स्ट्राँग रूम वरील पत्रे काही दिवसांपूर्वी बदलविण्यात आले होते. नवीन पत्रे टाकून जुने पत्रे आवारातच ठेवलेले होते. मात्र तहसील कार्यालयाकडून या जुने पत्रे विक्री बाबत कोणतीही निविदा अथवा लिलाव प्रक्रिया केली गेली नाही. परंतु तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी कोणतीही प्रक्रिया न राबविता संगनमताने परस्पर विक्री करून टाकले, अशी गोपनीय माहिती मिळाली.

या पत्रांच्या विक्रीबाबत संबंधित अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच दोषी अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता केदारनाथ वामन सानप यांनी उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांना समक्ष भेटून लेखी निवेदनाद्वारे दिली आहे याबाबत झालेल्या कारवाईची एक प्रत माहितीस्तव देण्यात यावी अशी मागणी देखील निवेदनात केली आहे.