भुसावळ जळगावहून मुक्ताईनगरकडे भरधाव वेगाने निघालेला अॅसीडचा टँकर नियंत्रण सुटल्याने शहरालगतच्या राष्ट्रीय महामार्गावर उलटला. 14 चाकी टँकर उलटताच चालकाच्या कॅबीनला आग लागली तर चालकाने उडी मारल्याने सुदैवाने तो बचावला. हा अपघात शनिवारी मध्यरात्री घडला.

नियंत्रण सुटल्याने टँकर उलटला
सूत्रांच्या माहितीनुसार, जळगावकडून मुक्ताईनगरकडे अॅसीड भरून भरधाव वेगाने टँकर निघाल्यानंतर चालकाचा टँकरवरील ताबा सुटताच तो महामार्गावर पलटी झाला. हा अपघात शनिवारी मध्यरात्रीनंतर 1.15 ते 1.45 वाजेच्या दरम्यान पु.ओ.नाहाटा महाविद्यालयाजवळील महामार्गावरील वळणावर घडली. सुदैवाने टँकरमधील अॅसीड बाहेर पडले नाही तर चालकाने उडी मारल्यामुळे त्याचा जीव वाचला. अपघाताची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक गणेश धुमाळ, सहायक फौजदार चंद्रशेखर गाडगीळ, महेश चौधरी, राहूल वानखेडे यांच्यासह होमगार्ड तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतूक दोन्ही बाजूंनी थांबवत परिसर रिकामा केला.
अग्निशमन दलाची धाव
पालिकेच्या अग्निशमन केंद्राच्या दोन बंबांनी आग विझवण्यासाठी तब्बल 30 मिनिटे प्रयत्न केल्यानंतर आग विझली. ट्रामा केअर सेंटरची आणि महामार्गावरील रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या. अर्धा तास पेटत असलेल्या टँकरमुळे परिसरात खळबळ उडाली होती मात्र वेळीच खबरदारी घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात रविवारी दुपारपर्यंत कुठलीही नोंद झाली नसल्याचे सांगण्यात आले.


