खडसेंचा धक्कादायक दावा: “महाजन यांचे महिला IAS अधिकाऱ्याशी संबंध”!गिरीश महाजनांचं संतप्त प्रत्युत्तर, “मी बोललो तर लोक तुम्हाला जोड्याने मारतील!”

मुंबई (प्रतिनिधी): राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद चिघळला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप करत दावा केला की, “महाजन यांचे एका महिला IAS अधिकाऱ्याशी घनिष्ठ संबंध आहेत.” या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

खडसे म्हणाले की, “महाजन यांचे त्या महिला अधिकाऱ्याशी संबंध असून, यासंदर्भातील कॉल डिटेल्स केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे आहेत. रात्री दीडनंतर शंभरहून अधिक कॉल झाल्याची माहिती आहे.” त्यांनी यासंदर्भात ‘गगनभेदी’ या यूट्यूब चॅनलवरील पत्रकार अनिल थत्ते यांच्या व्हिडिओचा हवाला दिला. “महाजन यांनी हे नातं फक्त कामापुरतं असल्याचं सांगितलं असलं, तरी शाह यांच्याकडे संपूर्ण कॉल रेकॉर्ड उपलब्ध आहेत,” असा गंभीर आरोप खडसेंनी केला.

महाजनांचं थेट प्रत्युत्तर: “मी उघड बोललो तर…”

या आरोपांनंतर गिरीश महाजन यांनी खडसेंना थेट आव्हान दिलं आहे. त्यांनी खडसेंच्या आरोपांचे फेटाळून लावलं असून, याला वैयक्तिक पातळीवर उत्तर दिलं आहे. “मी जर तुमच्या घरातली गोष्ट बाहेर काढली, तर लोक तुम्हाला जोड्याने मारतील. एकही पुरावा दाखवा, मी तात्काळ राजकारणातून निवृत्त होईन,” असं ते म्हणाले. महाजनांनी पत्रकार अनिल थत्तेंवरही निशाणा साधत त्यांना “भोंदू पत्रकार” असे संबोधले. “एका फसव्या पत्रकाराच्या माध्यमातून मुद्दामून हा बनाव केला जातोय. माझा अंत पाहू नका. मी बोलायला लागलो, तर खडसेंना तोंड काळं करून बाहेर पडावं लागेल,” असा तीव्र इशाराही त्यांनी दिला.

वादाला नवे रूप: राजकीय की वैयक्तिक?

एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील जुना संघर्ष नवीन वळणावर येत आहे. पूर्वी हा संघर्ष राजकीय असला, तरी यावेळी व्यक्तिशः आरोपांमुळे वाद अधिक गहिरा झाला आहे. यानंतर खडसे कोणते पुरावे सादर करतात, आणि महाजन यांची पुढील भूमिका काय असते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.