मुक्ताईनगर – तालुक्यातील टाकळी शिवारात शेतजमीनीच्या जुन्या वादातून चुलतभावाने अज्ञात हत्यारांनी वार करून तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

मृत तरुणाचे नाव सुनील रामसिंग चव्हाण (वय ३२, रा. टाकळी, ता. मुक्ताईनगर) असे आहे. सुनील चव्हाण आपल्या कुटुंबासह टाकळी गावात वास्तव्यास होता. तो शेती व मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता.
सुनील चव्हाण आणि त्याचा चुलतभाऊ प्रवीण जगन चव्हाण यांच्यात शेतजमीनीवरून जुना वाद सुरू होता. २५ मार्चच्या संध्याकाळी सुनील हा मित्रांसोबत जेवणासाठी दुचाकी (एमएच १९ एसी ४४७३) वरून निघून गेला होता. मात्र, त्यानंतर तो घरी परतला नाही.
२६ मार्च रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास सुनील चव्हाण यांचे नातेवाईक रस्त्यावरून जात असताना टाकळी शिवारातील सुरेश चव्हाण यांच्या शेताजवळ सुनील चव्हाण यांचा मृतदेह त्यांच्या दुचाकीजवळ आढळून आला.
मृतदेहावर मारहाणीच्या जखमा असल्याने हा खून असल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेहाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला.
या प्रकरणी मृत सुनील चव्हाण यांचा भाऊ संजय चव्हाण यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी प्रवीण जगन चव्हाण आणि बाळू ममराज जाधव (दोघेही रा. टाकळी, ता. मुक्ताईनगर) यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यातील एकाला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश पाटील करीत आहेत.


