वरणगावात टायरच्या दुकानाला भीषण आग ; मोटरसायकल खाक तर लाखोचे नुकसान, दोन तासाने आगीवर नियंत्रण ;

वरणगाव (प्रतिनिधी ) –

वरणगाव शहरातील लोककल्याण रुग्णालयाच्या भिंती शेजारील जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील टायरच्या दुकानाला दुपारच्या वेळेस आग लागली. या आगीत लाखो रुपयाची टायर्स व दुकानासमोरीली उभी असलेली मोटरसायकल जळाल्याने खाक झाल्याची घटना घडली. दोन तासानंतर चार अग्नीबंबानी आगीवर नियंत्रण मिळविले तर नगर परिषदेचा बंब उशीरा आल्याने दुकानदारासह नागरिकांना संताप व्यक्त केला.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील लोककल्याण रुग्णालयाचा संरक्षण भिंती शेजारी व जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील मुक्ताईनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रतिभा नगरमध्ये वास्तव्यास असलेले मुस्लीम अन्सारी यांच्या मालकीचे चारचाकी गाड्याचे टायर विक्रीचे दुकान होते. दि. १ शनिवार रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक दुकानात आग लागली होती. या आगीचा भडका पाहून दुकानदार दुकानाबाहेर पडून मदतीसाठी धावा करीत असताना आगीने रौद्ररूप घेत दुकाना शेजारच्या दोन तीन दुकानाला याची झळ बसली.

आग कोणत्या कारणाने लागली हे मात्र नक्की समजू शकले नाही . घटनेची वार्ता वाऱ्या सारखी शहरात पसरताच नागरिकांनी घटना स्थळाकडे धाव घेत वाटेल त्या मार्गाने आग विझविण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र आग मोठी असल्याने कारणाने भुसावळ नगर परिषद, आयुध निर्माणी, औष्णीक विज केंद्र, वरणगाव नगर परिषदेच्या अग्नी बंबाला पारचण करण्यात आले होते. दोन तासाच्या परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. सदर आगीत दुकानातील जुने व नवी असे एकूण दहा लाख रुपयांची टायर्स सह दुकान खाक झाले.

नागरिकांचा संताप

आगीची घटना घडल्यानंतर मदत करणाऱ्यापैकी सर्वात प्रथम वरणगाव नगर परिषदेच्या अग्नीशामक विभागाला यांची माहिती देत पाचरण केले होते. मात्र त्या आधी आयुध निर्माणीचा बंब, औष्णीक विज केंद्रातून व भुसावळ नगर परिषदेचे अग्नीबंब घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. त्यानंतर सुमारे एक तासाने वरणगाव नगर परिषद अग्नी बंब घटना स्थळी दाखल झाला. मात्र त्यावर मनुष्य बळ व तांत्रीक कर्मचारी नसल्याने अग्नीबंब कुच कमी ठरल्याने बघ्यांनी व राजकिय पदाधिकाऱ्यानी संताप व्यक्त केला.

पोलिसांची मदत व बघ्याची गर्दी

घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरल्याने घटना स्थळाकडे बघ्यांनी एकच गर्दी केली होती. त्यामुळे मदतकार्यास अडथळा निर्माण होत असल्याने सहपोलीस निरिक्षक जनार्धन खंडेराव व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटना स्थळाकडे धाव घेत गर्दी पांगवून मदत कार्यास सहकार्य केले.

रुग्णालयाच्या साहित्याचे नुकसान

लोककल्याण रुग्णालयाच्या संरक्षण भिंतीला लागून असलेल्या टायराच्या दुकानाला लागलेल्या आगीमुळे रुग्णालयाच्या औषधालयाला याची झळ बसून बंद असलेल्या खोलीतील साहीत्य व कागदपत्रेही जळाली आहे.