भुसावळात शिवरायांना अभिवादन -शिवजयंती उत्साहात : पालखी, मशाल रॅलीने वेधले शहरवासीयांचे लक्ष

भुसावळ : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (तारखेनुसार) शहर व परिसरात उत्साहाचे वातावरण होते. भगव्या पताकांनी शहर सजवण्यात आले तर जयंतीनिमित्त मध्यरात्रीपासून शहरातील रेल्वे स्थानकाजवळील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादनासाठी नागरिकांची गर्दी जमली होती. शहरात जयंतीनिमित्त मिरवणुका काढण्यात आल्या व महिलांनी काढलेल्या मशाल रॅलीने लक्ष वेधले होते.

शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन
शहरातील रेल्वे स्थानकाजवळील छत्रपतींच्या पुतळ्याला जयंतीनिमित्त आकर्षक रोशनाई करण्यात आली. सकल मराठा समाजातर्फे पुतळ्याजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीस उपस्थित पदाधिकार्‍यांनी अभिषेक केला. यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी पुतळ्यास माल्यार्पण केले. सकल मराठा समाज शहर व तालुकातर्फे रवींद्र ढगे यांच्या नेतृत्वाखाली ही मिरवणूक काढण्यात आली. शिवाजी नगरातून बुधवारी सकाळी 11 वाजता मिरवणुकीला सुरूवात झाली व चार तासानंतर मिरवणुकीचा समारोप झाला.

पालखीने वेधले लक्ष
शहरातील स्वराज्य सेनेतर्फे सुध्दा सकाळी 11 ते 4 या वेळात प्रशांत संतोष बागले यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत शिवप्रेमींच्या हाती भगवे झेंडे होते. कार्यकर्ते डिजेच्या वाद्यावर थिरकले. शिवजयंतीनिमित्त जामनेर रोडवरील साईबाबा मंदिरापासून मयुर जाधव यांनी आयोजित केलेली छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखी मिरवणुकीत सुध्दा अनेक शिवभक्त होते, विशेष करून विद्यार्थिनींचा अधिक सहभाग होता. पालखीच्या पुढे ढोल-ताशे हे पारंपारीक वाद्य वाजविण्यात आले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे महिलांनी मशाल रॅलीचे आयोजन केले. ही मशाल रॅली जामनेर रोडवरील अष्टभुजा देवीच्या मंदिरापासून दुपारी चार वाजता निघाली. या रॅलीत सुमारे 100 महिलांचा सहभाग होता.