55 वर्षे वयावरील कर्मचाऱ्यांना केंद्राध्यक्ष ऐवजी एक, दोन ,तीन क्रमांकाची कामे द्यावीत यासह विविध मागण्यांचा समावेश….
जळगाव,( प्रतिनिधी)– येत्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील निवडणूक कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडी अडचणींच्या संदर्भात माध्यमिक शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून दि. 16 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत निवेदन देण्यात आले. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर साहेब यांचे सोबत नियुक्त केल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विविध अडीअडचणींवर चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत जिल्ह्यातील वय वर्षे 55 वर्षे वरील- कर्मचाऱ्यांना केंद्राध्यक्ष म्हणून नियुक्ती ऐवजी क्रमांक एक, दोन, तीन क्रमांकाची कामे द्यावीत जेणेकरून वयोमानाचा विचार करता कामातून सूट न देता त्यांच्यावरील कामाचा ताण हलका होण्यास मदत होईल. शिक्षण विभागासोबत इतर शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांनाही निवडणूक कामे देताना केंद्राध्यक्ष म्हणून नियुक्तीचा विचार व्हावा.
दिव्यांग कर्मचारी, गरोदर, स्तनदा माता, लहान पाल्य असलेल्या माता, दुर्धर आजार, व्याधीग्रस्त कर्मचारी अचानक उद्भवलेली कौटुंबिक गंभीर परिस्थिती अशा बाबतीत कामातून सूट देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे
लोकसभा निवडणुकीच्या वेळी बी.एल.ओ.कर्मचाऱ्यांना निवडणूक मानधनाच्या संदर्भात अडचणी आल्या होत्या त्यात सकारात्मक विचार व्हावा. निवडणूक कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती पत्रासोबतच ईडीसी प्रमाणपत्र मिळावे किंवा पोस्टल बॅलेट पेपर मिळावेत जेणेकरून केवळ तेवढ्या कामासाठी तालुका स्तरावर चकरा मारणे थांबू शकेल व सुटसुटीत प्रक्रिया पार पाडण्यास मदत होईल.
माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून दिलेल्या निवेदनावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन निवडणूक उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर साहेब यांनी दिले. यावेळी माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष नारायण वाघ, समन्वयक तथा भुसावळ माध्य. शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीचे संचालक तुळशीराम सोनवणे, कार्याध्यक्ष गोविंदा व्ही पाटील, जिल्हा उपाध्यक्ष तथा माध्यमिक शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष गिरीश एस नेमाडे (भुसावळ) राजाराम धनगर, बोदवड संतोष कचरे समन्वय समिती मार्गदर्शक डॉ. मिलिंद बागुल सर यांचेसह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.




