बदलापूर : बदलापूर शहरातील एका शाळेत दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची संतापजनक बाब उघडकीस आल्यानंतर समाजमन संतप्त झाले आहे. याप्रकरणी जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालविण्याचे निर्देश देण्यात आले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल
बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केली आणि अशा घटना होऊ नयेत म्हणून कायमस्वरूपी ठोस उपाय योजण्यास सांगितले.
संस्थेचीसुद्धा चौकशी : फडणवीस
बदलापूर येथील दुर्दैवी घटनेत दोन तासात आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात संस्थेचीसुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच हा गुन्हा जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहेत, अशी माहिती देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.


