बदलापूर – शहरातील नामांकीत शाळेतील दोघा चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर नागरिक संतप्त झाले आहेत. शहर बंदची हाक दिल्यानंतर जमाव रस्त्यावर उतरला आहे तर रेल्वे रोकोही करण्यात आल्यानंतर तणावाचे वातावरण आहे. जमावाने केलेल्या दगडफेकीत तीन ते चार पोलीस जखमी झाल्याचे समजते.

जमावाची तुफान दगडफेक
मंगळवारी सकाळी संतप्त नागरिकांनी मुलींवर अत्याचार झाला त्या शाळेवर मोर्चा काढला मात्र तीन तास उलटून शाळा प्रशासनाकडून त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी कुणीही पुढे आली नाही. त्यावेळी आंदोलकांनी आपला मोर्चा बदलापूर रेल्वे स्थानकाकडे वळवत मध्य रेल्वेची वाहतूक रोखली. गेल्या काही तासांपासून वाहतूक पूर्णपणे ठप्प असल्याने मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेन अडकून पडल्या आहेत. पोलिसांनी या आंदोलकांना रेल्वे रुळांवरुन हटवण्याचा प्रयत्न केला. रेल्वे पोलिसांचे एक पथक आंदोलकांना हटवण्यासाठी त्यांच्यावर लाठीमार करण्याच्या तयारीत होते. मात्र, रेल्वे पोलिसांची तुकडी आपल्या दिशेने येताना दिसताच आंदोलकांनी तुफान दगडांचा मारा केला. त्यामुळे रेल्वे पोलिसांच्या पथकाने माघार घेत आंदोलकांशी पुन्हा चर्चा करण्याचा मार्ग स्वीकारला.
मंत्री गिरीश महाजन, केसरकर बदलापूरला रवाना
आंदोलकांची समजूत काढण्यासाठी मंत्री गिरीश महाजन व राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसकर हे तातडीने बदलापूरला रवाना झालेत. ते तिथे जाऊन आंदोलकांशी संवाद साधून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतील. आंदोलकांनी आरोपीला फाशी देण्याची मागणी केली आहे.
चौकशी समिती स्थापन
सरकारने या प्रकरणी तत्काळ वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंह यांच्या नेतृत्वात चौकशी समिती स्थापन केली आहे. एखाद्या महिला अधिकार्यानेच या प्रकरणाची चौकशी करावी, अशी सरकारची यामागील भावना आहे. पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गतही जी काही तातडीची कारवाई करण्याची गरज आहे, ती केली जात आहे. आरोपीवर तत्काळ आरोपपत्र दाखल केले जाईल. फास्ट ट्रॅक कोर्ट नियुक्त करण्याचा प्रस्तावही मागवण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीत अशा नराधमांना तत्काळ शिक्षा होईल असा राज्य सरकार व पोलिस प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यानुसार आवश्यक असणारी सर्वच कारवाई करण्याची सुरुवात अत्यंत वेगाने करण्यात आली आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
संस्थाचालकांवरही गुन्हा दाखल करा- सुप्रिया सुळे
हे घृणास्पद कृत्य करणार्या नराधमावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. नागरिकांचा रोष अतिशय योग्य असून गृहखात्याने त्यांच्या संतापाची दखल घेण्याची गरज आहे. पोलिसांना विनंती आहे की कृपया या व्यक्तीची सखोल चौकशी करुन त्यावर कठोरात कठोर कारवाई करावी. याशिवाय हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणार्या संस्थाचालकांवरही गुन्हा दाखल करण्यात यावा, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
गृहमंत्री आतातरी राजीनामा द्या
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या राजीनामाची मागणी केली आहे.
वरिष्ठ निरीक्षक कंट्रोल जमा
पोलिसांकडून याप्रकरणात चालढकल केल्याचे समोर आल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची ठाणे नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली. मात्र यानंतरही पालक आणि बदलापूरमधील नागरिकांचा रोष शमलेला नाही. दरम्यान फडणवीस यांचे ठाणे पोलिस आयुक्तांना आदेश दिल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निलंबित करण्यात आले आहे .


