बिबट्याचा वावर कायम; पिंजऱ्यालाही हुलकावणी ; वेल्हाळे शिवार व दीपनगर परिसरात भीतीचे वातावरण; गुराख्यावर हल्ल्याचा प्रयत्न :

वरणगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील वेल्हाळे शिवारातील शेती परिसर तसेच दीपनगर येथील राखेच्या बंडाजवळ गेल्या तीन महिन्यांपासून बिबट्याचा वावर असल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचे वारंवार दर्शन होत असून, त्याने दोन वेळा मानवावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.
सुमारे आठ दिवसांपूर्वी एका गुराख्यावर बिबट्याने हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखत गुराख्याने तेथून पळ काढल्याने तो बचावला. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी वनविभागाकडे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली.
नागरिकांच्या मागणीनुसार वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी भक्ष्यासह पिंजरा लावला आहे. मात्र, बिबट्या अद्याप पिंजऱ्यात अडकलेला नसून तो पिंजऱ्याला हुलकावणी देत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात शेतकरी, गुराखी व नागरिकांची नियमित ये-जा सुरू असल्याने संभाव्य धोका लक्षात घेता वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातून होत आहे.