भुसावळ (प्रतिनिधी) : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे (अभाविप) भुसावळ येथे ९ ऑक्टोबर रोजी युवती संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या पोस्टरचे नुकतेच अनावरण करण्यात आले. संमेलनाच्या माध्यमातून युवतींना विविध सामाजिक, शैक्षणिक तसेच समकालीन विषयांवर संवाद साधण्यासाठी आणि आपले विचार मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पोस्टर अनावरणप्रसंगी स्वागत समितीच्या उपाध्यक्षा कविता कोठारी, स्वागत समितीच्या सदस्या कुमोदिनी इंगळे, अभाविप विभाग संयोजक गायत्री पाटील, शहर अध्यक्षा प्रा. स्मिता बेंडाळे, प्रा. डॉ. सपना जंगले, कार्यक्रम प्रमुख प्रेरणा कदम, योजना कुरकुरे यांच्यासह अभाविपचे कार्यकर्ते उपस्थित होते. या युवती संमेलनात युवतींच्या सहभागातून विविध विषयांवर विचारमंथन व संवाद घडवून आणण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील विविध मुद्द्यांसह सध्याच्या काळातील महत्त्वाच्या विषयांवर युवतींना आपले मत मांडण्याची संधी मिळणार आहे. संमेलनाच्या तयारीला सुरुवात झाली असून, भुसावळ शहर व परिसरातील युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


