भुसावळ (प्रतिनिधी) – दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर तथा सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वारली चित्रकला प्रशिक्षण शिबिराचा समारोप समारंभ व वारली चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवार, दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता भुसावळ येथील ब्राह्मण संघ येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना. संजयजी सावकारे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रतिष्ठा महिला मंडळ, भुसावळच्या अध्यक्षा रजनीताई सावकारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. वारली चित्रकलेच्या माध्यमातून पारंपरिक कला, संस्कृती व लोकपरंपरेचे जतन आणि संवर्धन व्हावे, तसेच नवोदित कलाकारांना या कलेचे प्रशिक्षण व व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात सहभागी प्रशिक्षणार्थींनी साकारलेल्या वारली चित्रांचे प्रदर्शन यावेळी भरविण्यात येणार आहे. या समारोप समारंभास व वारली चित्रकला प्रदर्शनास कला, संस्कृतीप्रेमी नागरिक, महिला, युवक तसेच भुसावळकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


