भुसावळ, दि. 3 (प्रतिनिधी) : ऑर्डनन्स फॅक्टरी, भुसावळ परिसरात जखमी अवस्थेत आढळलेल्या माकडाचे गौरक्षकांच्या तत्परतेने सुरक्षित रेस्क्यू करण्यात आले. उपचारानंतर वन विभागाच्या देखरेखीखाली माकडाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले. ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात माकड गंभीर जखमी अवस्थेत असल्याची माहिती मिळताच गौरक्षक वैभव वाघे यांनी रेस्क्यूसाठी पुढाकार घेतला. त्यानंतर गौरक्षक वैभव वाघे, गौरक्षक प्रेम तायडे (बाळा भाऊ), गौरक्षक आदित्य धायडे (बल्लू भाऊ) आणि गौरक्षक पवन कोळी यांनी घटनास्थळी पोहोचून माकडाचे काळजीपूर्वक रेस्क्यू केले. रेस्क्यू केल्यानंतर जखमी माकडाला भुसावळ येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टर, वनरक्षक तसेच ‘वॉक विथ नेचर’ संस्थेच्या सदस्यांच्या देखरेखीखाली त्याच्यावर आवश्यक उपचार करण्यात आले. उपचारानंतर माकडाची प्रकृती स्थिर झाल्यानंतर वनरक्षकांच्या देखरेखीखाली त्याला नैसर्गिक अधिवास असलेल्या जंगल परिसरात सोडण्यात आले. त्यामुळे जखमी वन्यजीवाला सुरक्षितपणे पुन्हा निसर्गाच्या सान्निध्यात परतण्यास मदत झाली. वन्यजीव संरक्षणाचे आवाहन वन्यप्राणी जखमी किंवा संकटग्रस्त अवस्थेत आढळल्यास नागरिकांनी त्यांना त्रास न देता तातडीने वन विभाग अथवा अधिकृत रेस्क्यू टीमशी संपर्क साधावा. वन्यप्राण्यांना स्वतःहून पकडणे किंवा त्यांच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न टाळावा. प्रशिक्षित रेस्क्यू पथक व पशुवैद्यकांच्या मदतीनेच अशा प्राण्यांचे रेस्क्यू आणि उपचार करणे आवश्यक आहे. वन्यजीव हे पर्यावरणीय साखळीचा महत्त्वाचा घटक असून, त्यांच्या संरक्षणासाठी नागरिकांनीही जबाबदारीने सहकार्य करावे. या रेस्क्यू मोहिमेत गौरक्षक वैभव वाघे, गौरक्षक प्रेम तायडे, गौरक्षक आदित्य धायडे आणि गौरक्षक पवन कोळी यांनी तत्परतेने सहभाग घेतला.


