भुसावळ – भुसावळ साकेगाव रस्त्यावर नवोदय विद्यालयाच्या मागे यज्ञेश नेमाडे रा. हनुमान नगर भुसावळ यांच्या शेतात १६ जुलै रोजी एका अल्पवयीन मुलाचा नग्नावस्थेत कुजलेला मृतदेह आढळला होता. या बाबत भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुरनं १५३/२०२४ बी एन एस कलम १०३ (१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर या प्रकरणातील खुनी यास शोधून काढण्यास पोलिसांना महिनाभरा नंतर यश आले असून या कामगिरीबद्दल भुसावळ तालुका पोलिसांचे कौतुक होत आहे

मयताची ओळख पटविणे पोलिसांपुढे आव्हान ….
मात्र कोणताही ठोस पुरावा नसल्याने मयताची ओळख पटविणे अत्यंत जिकरीचे होते . तरीही भुसावळ तालुका पोलीसांनी तपासचक्र सुरू ठेवून अखेर तो मृतदेह अनिल कैलास आव्हाड (वय १२) रा. लोखंडी पुला जवळ भुसावळ याचा असल्याचा शोध लावला. त्या मुलाचा खून कपड्याने गळा आवळून केल्याचे शवविच्छेदनात निष्पन्न झाल्याने खून करणारा आरोपी शोधणे हे पोलिसांना मोठे आव्हान होते.
भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तसेच पथकातील व बाजारपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कसून तपास करत यावल तालुक्यातील लोसनबर्डी या गावातील १७ वर्षीय अल्पवयीन आरोपीला १८ ऑगस्ट रोजी पथकाने ताब्यात घेतले आहे. शिवीगाळ केल्याचे कारणावरून राग आल्याने खून केल्याचे कारण आरोपीने सांगितल्याचे सूत्राकडून समोर आले आहे .
. भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पो. नि. महेश गायकवाड व साकेगाव बीट तसेच बाजारपेठ पोलीस व उपविभागीय पोलीस अधीक्षक पथकातील सर्व पोलीस कर्मचारी यांचे कौतुक केले जात असून माझ्या सोबत असणाऱ्या सर्व अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्या अथक परिश्रमाने आम्ही आरोपीला पकडू शकलो असे या गुन्ह्याचे तपासाधिकारी पो नि महेश गायकवाड यांनी सांगितले.


