गणेशोत्सवात यंदा वैश्विक स्तरावरील गणपती सजावट आरास स्पर्धा होणार -पुण्यातील आभाळाखालची शाळा फाऊंडेशनचा उपक्रम

भुसावळ – पुणे येथील आभाळाखालची शाळा फाऊंडेशनच्या माध्यमातून यंदाच्या गणेशोत्सवात वैश्विक स्तरावरील गणपती सजावट स्पर्धा- माझा बाप्पा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी माणूस जगात कोठेही असला तरी गणेशोत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा करतो. परदेशात स्थायीक झालेल्या मराठी बांधवांमध्येही आपली मराठी संस्कृती टिकून रहावी या हेतूने ही स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. मराठी माणूस परदेशातदेखील आपली मराठी संस्कृती विसरत नाही. सालाबादाप्रमाणे लवकरच गणेशोत्सवात मराठी माणूस कुठेही असला तरी उत्साह कायम असतोच आणि सर्वांच्या घरात लाडका बाप्पाचे आगमन होते. या गणेशोत्सवात आभाळाखालची शाळा फाऊंडेशनने एक अभिनव स्पर्धा आयोजीत केली आहे.

गुगल फार्म भरून देण्याचे आवाहन
जगभरात घरात गणेशोत्सव साजरा करणार्‍या भाविकांनी आपल्या घरातील बाप्पाचा तीन मिनिटाची एक व्हिडिओ क्लिप फाऊंडेशनकडे पाठवायची आहे. ज्यात स्थापन झालेला गणपती बाप्पा आणि त्यासाठी केलेली मखर अर्थात आरास याची माहिती पाठवायची आहे. सोबतच निवेदनात स्पर्धकांना पूर्ण नाव, आपण कुठल्या देशात असता, आणि आपण गणेशोत्सव कसा साजरा करतो? याची माहिती कळवायची आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व क्लिप्स आभाळाखालची शाळा फाऊंडेशनतर्फे प्रसारीत केल्या जातील. या योगाने जगभरातल्या मराठी बांधवांना आपण साजरा केलेल्या उत्सवाची माहिती मिळेल तसेच महाराष्ट्रभरातील लोकउत्सव जगातही कसा साजरा होते, हे पाहता येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना गुगल फॉर्म भरुन द्यावा लागेल, असे आभाळाखालची शाळा फाऊंडेशनचे संचाालक दिलीप पुराणिक व स्वप्नील पुराणीक यांनी कळवले आहे.