वरणगांव :-

शहरातील पुरातन श्रीराम मंदिराचे पुजारी यांच्या घरात गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतला . यामुळे घरात धावपळ सुरू झाली . मात्र, रामनवमी निमित्त उपस्थित युवा भाविकांनी शर्थीचे प्रयत्न केल्याने आग आटोक्यात आली . तर नगरपरिषदेचा अग्निशामक बंब उशिराने आल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली .
याबाबत सविस्तर असे की वरणगांव शहरातील पुरातन श्रीराम मंदिर येथे रामनवमी निमित्त दि . ९ एप्रील पासुन संगीतमय महाशिवपुराण कथा सुरू असुन दि . १७ एप्रील रोजी दुपारी १२ वाजता राम जन्मोत्सव साजरा करण्यासाठी पुजारी बालकदास बैरागी यांच्या घरात प्रसाद तयार करण्याची तयारी सुरू होती . मात्र, यावेळी स्वयपाक घरातील गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतल्याने घरातील महिलांची धावपळ सुरू झाली . याची दक्षता घेवून राहुल माळी, निखील बैरागी, सुरजदास वैष्णव, ललीत पटेल, अक्षय बैरागी, ओम पटेल, प्रणय वैष्णव, भुषण गव्हाळे , राजेश इंगळे, मगरे, शंकर पटेल, विजय वाघ (पत्रकार ) यांचेसह इतर युवा भाविकांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली . यामुळे पुढील होणारा मोठा अनर्थ टळण्यास मदत झाली . तर या आगीत किरकोळ साहित्याचे नुकसान झाले .
आग लागल्याचे निदर्शनास येताच उपस्थितांनी नगर परिषदेच्या अग्निशामक दल विभागाशी संपर्क साधला . मात्र, नगरपरिषदेचा अग्निशामक बंब आग आटोक्यात आल्यानंतर घटनास्थळी दाखल झाल्याने उपस्थितांनी नाराजी व्यक्त करीत नगर परिषदेच्या अग्निशामक दलाचा कारभार साप गेल्यावर काठी मारण्यासारखा झाल्याचे दिसून आले . यावेळी नगर परिषदेचे कार्यालयीन अधिक्षक पंकज सुर्यवंशी यांचेसह इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती जाणून घेतली . तसेच मागील काही दिवसापूर्वी दिपनगर येथे कोळसा वाहुन नेणाऱ्या मालगाडीच्या डब्यातील कोळश्याला आग लागली होती . मात्र, यावेळीही नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला आग आटोक्यात आणण्यासाठी अपयश आले होते .यामुळे आयुध निर्माणीच्या अग्निशामक बंबास पाचारण करावे लागले होते .


