भुसावळ, (प्रतिनिधी ) : पुणे-दानापूर स्पेशल एक्स्प्रेसमधील प्रवाशाचा मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारीचा तपास करताना भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाच्या सीपीडीएस पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे संशयिताचा माग काढला. भुसावळ, मलकापूर व अकोला आरपीएफच्या समन्वयातून छत्तीसगडमधील संशयिताला मलकापूर रेल्वे स्थानकावर ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून विविध कंपन्यांचे तब्बल १३ मोबाईल जप्त करण्यात आले असून, त्यांची अंदाजे किंमत २ लाख ९७ हजार ५०० रुपये आहे. रविवार, ४ ऑक्टोबर रोजी ट्रेन क्रमांक ०१४४९ पुणे-दानापूर स्पेशलच्या एस-श्री डब्यातून प्रवाशाचा मोबाईल चोरीला गेल्याची माहिती रेल मदत अॅपद्वारे भुसावळ आरपीएफला मिळाली. त्यानंतर सीपीडीएस पथकाने भुसावळ रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये संशयित व्यक्ती ट्रेनमधून उतरून स्थानकाबाहेर जाताना तसेच काही वेळाने पुन्हा स्थानकात येऊन भुसावळ-बडनेरा मेमूमध्ये चढताना दिसून आली. सीसीटीव्ही फुटेजमधून मिळालेली माहिती अकोला आरपीएफला देण्यात आली. त्यानंतर मलकापूर व अकोला आरपीएफच्या संयुक्त पथकाने कारवाई करत मलकापूर स्थानकावर संशयिताला ताब्यात घेतले. या कारवाईत कर्तव्यावर असलेले सहायक सुरक्षा निरीक्षक वीरपाल सिंह तसेच अकोला आरपीएफ पथकातील प्र.आ. गणेश जकाते आणि आ. गोविंद सिंह यांनी सहभाग घेतला. बॅगेत सापडले १३ मोबाईल ताब्यात घेतलेल्या आरोपीने आपले नाव अंकित साहू उर्फ दीपक साहू (२५, रा. इंद्रानगर, कोरबा, छत्तीसगड) असे सांगितले. त्याच्या निळ्या रंगाच्या बॅगेची झडती घेतली असता सॅमसंग, ओप्पो, रियलमी, वनप्लस, रेडमी, विवो, इन्फिनिक्स आणि जिओ भारत या कंपन्यांचे एकूण १३ मोबाईल आढळून आले. प्राथमिक चौकशीत आरोपीने हे मोबाईल मागील एक ते दोन दिवसांत भुसावळ-मलकापूरदरम्यान धावणाऱ्या विविध रेल्वेगाड्यांमधून चोरी केल्याची माहिती दिली. जप्त मोबाईलची एकूण किंमत सुमारे २ लाख ९७ हजार ५०० रुपये आहे. आरोपी जीआरपीच्या ताब्यात आरोपीसह जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी जीआरपी भुसावळ यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मोबाईलच्या मालकीबाबत आयएमईआय क्रमांकाच्या आधारे पडताळणी सुरू आहे. या कारवाईमुळे रेल्वेतील मोबाईल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.


