डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य जगाला दिशा देणारे – सुनील शिंदे


भडगाव –
भडगाव येतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य अजूनही पूर्णपणे समाजापुढे आले नाही. त्यांचे विचार व कार्य काळाच्या कितीतरी पुढे होते. एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची स्थापना किती तरी वर्षांपूर्वी बाबासाहेबांनी केली होती. कुटुंब नियोजन, स्त्रियांची उन्नती, हिराकूड व दामोदर खोरे प्रकल्प, प्रौढांना मतदानाचा अधिकार अशा कितीतरी बाबतीत बाबासाहेबांचे कार्य हिमालयाच्या उंचीचे आहे. त्यांचे कार्य जगाला दिशा देणारे आहे. संविधान निर्मितीसाठी बाबासाहेबांनी घेतलेले अपरिमित कष्ट, भारताच्या चलन स्वीकृतीमागील त्यांची भूमिका हे तर कधीही न विसरण्यासारखे आहे. परंतु अजूनही त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात मांडलेले विचार व केलेले कार्य सर्वसामान्य लोकांपर्यंत पूर्णपणे पोहोचलेले नाही. ती पोहोचवण्याची जबाबदारी शिक्षित वर्गाची आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व वक्ते सुनील शिंदे यांनी केले.
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड होते. त्यांनी यावेळी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. विचारमंचावर उपप्राचार्य प्रा. एस. आर. पाटील व प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. अविनाश भंगाळे उपस्थित होते.
याप्रसंगी पाचोरा येथील शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य व मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. वासुदेव वले यांना महाराष्ट्र शासनाचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाच्या ग्रंथपाल प्रा. आर. एम. गजभिये यांनी महाविद्यालयास डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, सावित्रीबाई फुले जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, ग्रंथपाल दिन, आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त ग्रंथ भेट देण्याचा संकल्प जाहीर केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागप्रमुख डॉ. अतुल देशमुख यांनी केले तर शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक डॉ. दिनेश तांदळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.