खाजगी ट्रॅव्हल्स पुलावरून कोसळली : एक ठार : 34 प्रवासी जखमी –

सिन्नर : खाजगी आराम बस पूलावरून कोसळून झालेल्या अपघातात एक जण ठार तर 34 प्रवासी जखमी झाले. हा अपघात नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा येथे घडला. महाकाली ट्रॅव्हल्सची खाजगी आराम बस पुण्याहून नाशिककडे जात असताना पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला.

जागीच एक प्रवासी ठार
महाकाली ट्रॅव्हल्सची खाजगी आराम बस (एम.एच.14 सी.डब्ल्यू.9072) खाली कोसळून अपघात झाल्याने एक प्रवासी ठार तर 34 जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती वावी पोलिसांनी दिली. जखमी रुग्णांना त्वरीत सिन्नर येथील खाजगी रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार, पोलीस उपनिरीक्षक देविदास लाड, नितीन कदम तसेच अन्य सहकारी आणि महामार्ग पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

अपघात झाल्यानंतर दहा मिनिटातच नांदूरशिंगोटे व सिन्नर येथील रुग्णवाहिका तातडीने दाखल होत स्थानिक ग्रामस्थ व पोलीस यांच्या मदतीने जखमींना बाहेर काढत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान अपघातात मृत झालेल्या प्रवाशाचे नाव कश्यप मुकेशभाई पाठक (35 , अहमदाबाद, गुजरात) येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.