भुसावळ : शहरातील जुना सतारे भागातील जगतजननी मरिमाता मंदिराच्या बारागाड्या व यात्रोत्सव मंगळवार, 9 एप्रिल रोजी होत आहे. यंदा समितीने बारागाड्या ओढल्या जाणार्या मार्गावर दोन्ही बाजूंनी बॅरिकेटींग करण्याचे नियोजन केले आहे. यासेाबत तब्बल 550 स्वयंसेवकांसाठी टी शर्ट वाटप केले आहेत. बारागाड्यांवरही निर्धारित करुन दिलेले भाविकच बसतील. त्यांनाही ओळखीसाठी टी शर्ट देण्यात येईल. टवाळखोर, दारुड्या तसेच गाड्यांवर बसणार्यांवर कारवाई केली जाणार आहे.
जगतजननी मरिमाता मंदिराच्या यात्रोत्सवातील बारागाड्यांमध्ये गेल्या दोन वर्षांपूर्वी दुर्घटनेत एकाचा बळी गेला होता. या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षापासून समितीने व्यापक नियोजन केले आहे. यंदा जळगाव रोडवर बारागाड्या ओढल्या जातील त्या मार्गावर दुभाजक व रस्त्याच्या बाजूला दोन्ही ठिकाणी बॅरिकेटींग केले जाणार आहे. बारागाड्यांवर बसणारे भाविक तसेच बॅरिकेटींगच्या आतील 550 स्वयंसेवकांना टी शर्ट दिले जाणार आहेत. या व्यतिरिक्त कुणी बारागाड्यांवर बसेल त्यास पोलीस मज्जाव करतील, यासोबतच यात्रोत्सवातील टारगट, दारुड्यांवर अधिक लक्ष केंद्रीत केले जाईल, अशा सूचना दिल्या. समितीचे अध्यक्ष देवेंद्र सपकाळे, उपाध्यक्ष दुर्गेश कोळी, मंजीत कोळी, सचिव श्रेयस इंगळे, कार्याध्यक्ष राहुल सोनवणे आदी सहकार्य करीत आहे.
मरिमाता यात्रोत्सवावर नजर ठेवण्यासाठी यंदा मंदिर व जळगावरोडवर 35 सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यासोबतच ड्रोन कॅमेर्यांचीही नजर राहिल. यात्रोत्सवात विविध 250 ते 300 दुकाने थाटली जातात. या दुकानदारांना यंदा समितीतर्फे प्रथमच मोफत भेाजनाची व्यवस्था केली जाणार आहे. यामुळे उदरनिर्वाहासाठी बाहेरगावाहून आलेल्या दुकानदारांना मोठा दिलासा मिळेल.
मंगळवारी होणार्या यात्रोत्सवाच्या पुजेला रविवारपासून सुरवात झाली. भगत मयुर भोळे, दुर्गेश पाटील, राहूल पाटील यांनी चंद्रमोळी महादेवाचा अभिषेक केला. मंगळवारी मध्यरात्री 12 वाजता देवीची महाआरती होईल तर मंगळवारी पहाटेपासून महापुजेला सुरवात होईल. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयेाजन करण्यात आले आहे.



