गौरक्षकांचा नगरपंचायतीवर मोर्चा ; शहरात गौ मांस विक्री करण्यास प्रतिबंध !


बोदवड :
शहरातील अग्रसेन भवन ते नगरपंचायतीवर गौरक्षकांकडून मोर्चा काढण्यात आला. तद्नंतर; शहरातील अवैध कत्तलखाने , गौ मांस विक्री बंदी यासंदर्भात विविध मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी गजानन तायडे यांना देण्यात आले. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत तब्बल सात तास ठिय्या आंदोलन गौरक्षकांकडून करण्यात आले. आंदोलनाच्या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात होता. डिवायएसपी राजकुमार शिंदे आंदोलन स्थळी तळ ठोकून होते. वादग्रस्त पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी तालुक्यातील तरुण आंदोलनातून परावृत्त व्हावे यासाठी व्हाट्सअप काॅल अनेकांना लावले असल्याची माहिती एकाने नाव न सांगण्याच्या अटीवरुन सांगितली. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गजानन तायडे यांनी कर्मचारी व पोलीस सोबत घेत शहरात संशयित अनाधिकृत गौ मांस विक्री करणार्यांना नोटीसा बजावल्या.त्यानंतर ; उपस्थित आंदोलनकर्त्यांना कारवाईबाबत लेखी आश्वासन देण्यात आले.

नगरपंचायत व पोलीस प्रशासनातर्फे दिनांक 13 रोजी संयुक्तरित्या बोदवड शहरात अनाधिकृत सुरु असलेल्या कत्तलखान्यांवर व गोवंशाच्या मांसाचा वापर करणाऱ्या हॉटेलवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे लेखी नोटीसीत नमुद आहे. तसेच गौ मांस विक्री व्यवसायाच्या उद्देशाने बांधण्यात आलेले ओटे तिन दिवसांत काढण्याबाबत सहा जणांना नोटीस देण्यात आलेली आहे. नगरपंचायतीकडुन उघड्यावर गोवंश मांस विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. तसेच येणार्या सर्व साधारण सभेमध्ये विषय घेवुन शहरातील नादुरुस्त असलेले CCTV कॅमेरे दुरुस्त करण्यात येतील व संशयीत ठिकाणी मार्गावर आवश्यक त्या नविन CCTV कैमेर लावण्यात येतील. शहरातील मोकाट गुरांवर जिल्हा पशु वैद्यकिय अधिकारी यांचेकडे शहरातील गोवंशांना टॅगींग करण्याकरीता पाठपुरावा करण्यात येईल. ज्या व्यक्तीकडे टॅगींग नसलेले गोवंश सापडतील त्या व्यक्तींवर प्रचलीत कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. शहरात अवैध कत्तलखाने सुरु असल्याबाबत निदर्शनास आल्यास दोषी व्यक्तींवर नगरपंचायत प्रशासना तर्फे कारवाई करण्यात येईल. असे लेखी आश्वासन नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गजानन तायडे यांनी गौरक्षक आंदोलकर्त्यांना दिले.