डीवायएसपी सिंह यांच्या वाहनाला डंपरची धडक –

यावल : फैजपूर पोलिस उप विभागीय अधिकारी तथा सहायक पोलिस अधिक्षक अन्नपुर्णा सिंह यांच्या खासगी वाहनाला वाळू वाहून नेणा-या डंपर चालकाने धडक दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी डंपरचालक, क्लिनर आणी डंपर मालक अशा तिघांविरुद्ध फैजपूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डंपर चालकास अटक करण्यात आली असून क्लिनर फरार झाला आहे. शुक्रवारी रात्री घडलेल्या घटनेमुळे जळगाव पोलिस दलात खळबळ माजली आहे.

मयूर सुरेश कोळी (रा. डांभुर्णी, ता. यावल), असे अटक करण्यात आलेल्या डंपर चालकाचे नाव आहे. यावल रोडवर अवैध वाळू वाहतुक सर्रासपणे सुरु असल्याची माहिती पोलिस अधिकारी अन्नपूर्णा सिंग पाटील यांना समजली. त्या माहितीच्या आधारे अन्नपुर्णा सिंह यांनी आपल्या सहका-यांसह खासगी वाहनाने यावल रस्त्यावर जावून संशयीत भरधाव वेगातील डंपरला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र डंपर चालकाने त्याच्या ताब्यातील डंपर थांबवले नाही अथवा वेग देखील कमी केला नाही. त्यामुळे सिंह यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने डंपरचा पाठलाग करुन त्याला ओव्हरटेक केले. मात्र डंपर चालकाने पुढे धावणा-या वाहनाला धडक देत वाहनासह पलायन केले.