जळगावात 4 रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हास्तरीय वारकरी भवनाचे भूमिपूजन -जळगाव जिल्हा वारकरी भवन हा इतर जिल्ह्यांसाठी पथदर्शी प्रकल्प ठरावा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव : प्रस्तावित जिल्हा वारकरी भवन 55 एकरांच्या भूखंडावर होणार असून सात कोटी एवढा निधी अपेक्षित असून हे इतर जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक प्रकल्प ठरणार आहे. वारकरी प्रशिक्षण, विद्यार्थी वसतीगृह, संत निवास, सुटीतील संस्कार शिबिरे आदी माध्यमातून संस्कारी पिढी घढवण्यासाठी उत्तम व्यासपीठ ठरणार आहे. जिल्हास्तरीय वारकरी भवन बांधकाम जळगाव परिसरात होण्यासाठी जिल्ह्यातील वारकरी मंडळींची व लोकप्रतिनिधींची सातत्याने मागणी होती. त्यानुसार खेडी शिवारात सहा कोटी सहा लक्ष निधीचे वारकरी भवन मंजूर केले असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. यासाठी सर्व खासदार व आमदार व जिल्हा प्रशासनाचे सहकार्य लाभल्या बद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आभार व्यक्त केले.
वारकरी भवनाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते प्रस्तावित आहे. त्या नियोजनासाठी शनिवार, 2 मार्च 2024 रोजी जळगाव येथे अजिंठा विश्रामगृहात झाली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती. सोमवार, 4 मार्च 2024 रोजी सायंकाळी सहा वाजता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याहस्ते वारकरी भवनाच्या वास्तूचे भूमिपूजन होणार आहे. या भूमिपूजन कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.