भुसावळ –
भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन आयोजित बीसारा लेडीज रनच्या सराव सत्रास उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी पन्नासहून अधिक महिलांची उपस्थिती लाभली. यावेळी मुख्य अतिथी म्हणून स्वतः उत्तम धावपटू असलेल्या भुसावळ वाहतूक शाखेच्या प्रमुख ए पी आय सौ रुपाली चव्हाण उपस्थित होत्या.
सुरुवातीस ठीक ६ वाजता प्रा प्रविण फालक यांच्या मार्गदर्शनात वॉर्म अप व्यायाम प्रकार घेण्यात आला. त्यानंतर ठीक ६ वाजून १० मिनिटांनी उदघाटनाचा कार्यक्रम डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानासमोर आर पी डी रोडवर संपन्न झाला. सुरुवातीस डॉ नीलिमा नेहेते व डॉ चारुलता पाटील यांनी रुपाली चव्हाण यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी रुपाली चव्हाण यांनी आपल्या मनोगतात सांगितले कि त्यांचे या रनमध्ये सहभागी होण्याचे सलग तिसरे वर्ष असून भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन सदरचा रन दरवर्षी आयोजित करत असल्यामुळे शालेय जीवनापासून बंद झालेली धावण्याची आवड व इतर व्यायाम प्रकार माझ्यासारख्या कित्येक महिलांना वयाच्या ३५व्या वर्षानंतर देखील शक्य झाले. त्याबद्दल त्यांनी भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे कौतुक केले व आभार देखील मानले. त्यानंतर रुपाली चव्हाण व या रनमध्ये प्रथमच सहभागी झालेल्या चंपा जहांगिड यांच्या हस्ते नारळ वाढवून सराव सत्राचे विधिवत उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रविण पाटील यांनी केले. यावेळी डॉ तुषार पाटील, गणसिंग पाटील, ब्रिजेश लाहोटी,प्रविण वारके,रणजित खरारे यांची उपस्थिती होती.
त्यानंतर ठीक ६.१५ वाजता प्रत्यक्ष धावायला सुरुवात होऊन धावतांना नियमित महिला धावपटू नवोदित महिला सहभागींना धावण्याचे बारकावे सांगत होते. त्यानंतर ६.५० वाजता पुन्हा मैदानावर परतून स्ट्रेचिंग व्यायाम प्रकार घेण्यात आला व ठीक ७ वाजता सराव सत्राची सांगता झाली.
लेडीज रन ३ मार्च रोजी ३ किमी, ५ किमी व १० किमी या ३ श्रेणींमध्ये आयोजित करण्यात आला असून नावनोंदनी सुरु असून त्यासाठी जामनेर रोडवरील नेहेते हॉस्पिटल येथे डॉ नीलिमा नेहेते (९३२५६३८७१७) किंवा पंचमुखी हनुमान मंदिराजवळील सुप्रभा हॉस्पिटल येथे डॉ चारुलता पाटील (९८२३७९९७५८) यांच्याशी संपर्क साधता येईल. तसेच ऑनलाईन पद्धतीने देखील टाऊनस्क्रिप्ट या संकेत स्थळावर नावनोंदणी शक्य असून त्यासाठी प्रविण पाटील (९४२२७७२१७८) यांच्याशी संपर्क करावा असे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे.



