भुसावळ : पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येतील मंदिरात रामलल्ला सोमवार, 22 जानेवारी रोजी मुहूर्तावर विराजमान झाले. हा सोहळा भाविकांनी दिवाळीपेक्षा मोठ्या उत्साहात साजरा केला. भुसावळ शहर व विभागात नागरीकांनी ठिकठिकाणी शोभायात्रा काढत रामनामाचा जय-जयकार केला तर प्रभू श्रीराम मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी दिसून आली. सायंकाळी दीपोत्सवाने मंदिरे उजळली होती तर ठिकठिकाणी नागरीकांनी घराबाहेर सडा-रांगोळी काढून अंगण सुशोभीत केले होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर सर्वत्र जोरदार आतषबाजी करण्यात आली तर भाविकांना बुंदीचे लाडू, केळी व पेढ्यांचा प्रसाद वाटप करण्यात आला.

सावदा येथे भव्य राम फेरी व धार्मिक कार्यक्रम
सावदा : अयोध्येतील राम मंदिरात रामलला मूर्ती प्रतिष्ठास्थापनेनिमित्त सोमवारी सकाळी येथील सुंदर राम मंदिरापासून पालखीत भगवान श्रीराम यांची मूर्तीं विराजित करून सकाळी सात वाजेदरम्यान भव्य अशी रामफेरी शहरातून काढण्यात आली. यावेळी लहान-थोर, स्त्री, पुरुष सर्व स्तरातील नागरिक यावेळी उपस्थित होते. सुमारे पाच हजारांवर नागरीक यात सामील झाले. श्रीराम जय राम-जय जय रामच्या गजरात राम फेरी शहरातून निघाली. यावेळी संपूर्ण शहरात प्रत्येक ठिकाणी भव्य रांगोळ्या काढण्यात आल्या. ठिकठिकाणी सजावट करण्यात येऊन श्रीराम यांचे प्रतिमा पूजन यावेळी करण्यात आले. दुपारी 11 वाजे दरम्यान सुंदर राम मंदिरात सावदा येथील कारसेवकांचा सत्कार देखील करण्यात आला. यानंतर राम रक्षा पाठ करण्यात आला. अयोध्या येथे मूर्ती प्रतिष्ठास्थापना होईपर्यंत हे पाठ झाले या नंतर आरती होऊन प्रसाद वाटप करण्यात आला. सायंकाळी याच मंदिरात भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातून प्रत्येकाने घरून एक दिवा आणून मंदिरात लावला यामुळे मंदिर उजळून निघाले होते. दिवसभर शहरात विविध ठिकाणी प्रसाद वाटप करण्यात आला. सायंकाळी अनेक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. दिवसा तसेच रात्री शहरवासीय नागरिकांनी फटाके फोडून प्रती दिवाळी साजरी केली. दिवसभर येथे रामलला प्रतिष्ठास्थापनेचा उत्साह पहावयास मिळाला.


