डॉ. जगदीश पाटील शिक्षणशास्त्र विषयात नेट परीक्षा उत्तीर्ण

भुसावळ – बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य तथा महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ. जगदीश लक्ष्मण पाटील यांनी युजीसीमार्फत घेण्यात आलेली राष्ट्रीय पात्रता परीक्षा तथा नेट परीक्षा शिक्षणशास्त्र विषयात उत्तीर्ण केली आहे.
केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत असणाऱ्या यूजीसीमार्फत एनटीएतर्फे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक राष्ट्रीय पात्रता परीक्षा तथा नेट परीक्षा डिसेंबर 2023 मध्ये पार पडली. या नेट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. त्यात शिक्षणशास्त्र विषयात डॉ. जगदीश पाटील पात्र ठरले आहेत. त्यांनी यापूर्वी मराठी विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त केली असून 2022 यावर्षीची नेट परीक्षा देखील मराठी विषयात उत्तीर्ण केली आहे. सलग दुसर्‍या वर्षी नेट परीक्षा पात्र झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.