भुसावळची पालखी शेगावात ; गण गण गणात बोते’ च्या जपाने भाविक मंत्रमुग्ध :

भुसावळ : येथिल जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज देवस्थानची पालखी मंगळवारी श्री क्षेत्र शेगाव येथे ‘गण गण गणात बोते’ च्या गजरात दाखल झाली असता पालखी सोबत असलेल्या वारक-यांचा शिण क्षणार्धात दूर झाल्याचे दिसून आले
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही उत्साहात या देवस्थानची पालखी दि.१२ रोजी सकाळी भुसावळहून शेगावकडे मार्गस्थ झाली असता सायंकाळी मुक्ताईनगर येथे मुक्काम करीत तद्नंतर दि.१३ मलकापूर,दि.१४ नांदुरा व दि.१५ रोजी अन्नकुटी येथे मुक्कामी हाेती. दरम्यान या पालखीचे स्वागत भाविक ठिकठिकाणी रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढीत, पूष्पवर्षाव करीत,पणत्या लावून तसेच भोजन, चहा, नाश्त्याची सोय करीत होते. आज दि.१६ रोजी सकाळी ७ वा. अन्नकुटीहून ही पालखी ‘ गण गण गणात ‘ च्या गजरात निघाली असता सकाळी ११ वाजता श्री क्षेत्र शेगाव गजानन महाराज समाधी मंदिराजवळ पोहोचली तेव्हा भाविक मंत्रमुग्ध झालेले दिसले. महाराष्ट्रातील इतर प्रांतांतूनही शेगावात पालख्या दाखल झाल्याने सर्व भक्त श्री गजाननमय झाल्याचे येथे पहावयास मिळाले.