नाशिक, : येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बी.वाय.के. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पर्वणी शेखर जोशी हिची दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन परेडसाठी निवड झाली आहे.
पर्वणी ही बी. कॉमच्या शेवटच्या वर्षाला असुन महाविद्यालयात एन सी सी कॅडेट आहे.नाशिक येथील 7 महाराष्ट्र बटालियनतर्फे ती राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणार आहे. सदर परेडसाठी असणारी निवड प्रक्रिया ही अतिशय खडतर व आव्हानात्मक असते. निवड प्रक्रियेचे सर्व टप्पे पार पाडून सर्वात शेवटी काही ठराविक उत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड दिल्ली येथे होणाऱ्या शिबिरासाठी होत असते. अविरत प्रयत्न व चिकाटीद्वारे विद्यार्थ्यांना या शेवटच्या टप्प्यांपर्यंत पोहोचता येणे शक्य होते. पर्वणी जोशी हिने हे सर्व टप्पे पार करून तिची निवड झाल्याबद्दल तिचे विशेष कौतुक होत आहे. पर्वणीने या अगोदर सुद्धा आपल्या कर्तुत्वाचा ठसा एन सी सी च्या वेगवेगळ्या राष्ट्रीय स्तरावरील शिबिरांमध्ये निवड होऊन उमटवलेला आहे.मागील वर्षी ॲडव्हान्स लिडरशीप कॅम्प या राष्ट्रीय स्तरावरील शिबिरासाठी तिची निवड झाली होती. यावर्षी एन सी सी तर्फे राज्यस्तरावरील स्कॉलरशिप साठी सुद्धा तिची निवड झालेली आहे. तिच्या ह्या निवडीसाठी 7 महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल तरुण खन्ना, प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल रवी व्यास व एनसीसी अधिकारी कॅप्टन देवेंद्र भवारी यांनी मार्गदर्शन केले. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव व मानव संसाधन संचालिका डॉ. दीप्ती देशपांडे व बी. वाय.के. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी यांनी तिच्या या यशाबद्दल अभिनंदन केले. पर्वणी कै. प्रा. डॉ. शेखर जोशी व सेवानिवृत्त प्रा. जयश्री जोशी यांची मुलगी आहे.

—


