भुसावळ : पिता-पूत्राच्या कौटुंबिक वादानंतर मुलाकडून त्रास होत असल्याने त्रस्त पित्याने 112 हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून मदतीची मागणी केल्यानंतर मदतीसाठी गेलेल्या भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या कर्मचार्यावरच 28 वर्षीय विकृत मुलाने चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना शहरातील गडकरी नगराजवळील शिवदत्त नगर परीसरात रविवारी दुपारी तीन वाजता घडली. या हल्ल्यात बाजारपेठचे हवालदार अक्षय चव्हाण जखमी झाले असून स्थानिक स्तरावर उपचार केल्यानंतर त्यांना उपचारार्थ जळगावी हलवण्यात आले आहे.

पोलिस येताच केला हल्ला
सूत्रांच्या माहितीनुसार, गडकरी नगराजवळील शिवदत्त कॉलनीत तरुण पित्याला त्रास देत असल्याने मदतीसाठी पित्याने 112 क्रमांकावरून मदत मागितल्यानंतर बाजारपेठचे हवालदार अक्षय चव्हाण हे मदतीसाठी धावून गेले. संशयित मुलाला समज देवून सांगत असताना विकृत मुलाने स्वयंपाक घरातील चाकूने चव्हाण यांच्यावर हल्ला चढवला. या घटनेनंतर संशयित पसार झाला असून चव्हाण यांच्यावर स्थानिक स्तरावर उपचार केल्यानंतर त्यांना जळगाव येथे उपचारार्थ हलवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. बाजारपेठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तातडीने संशयितांचा शोध घेण्याचे आदेश डीबी कर्मचार्यांना दिले आहेत.


