चोपडा तालुक्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढळले –

चोपडा : देशभरातील नागरीकांची चिंता वाढवणारा कोरोना पुन्हा पायरू लागल्याने नागरीकांमध्ये चिंता व्यक्त होत असताना जळगाव जिल्ह्यातही आता कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाने नागरीकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. चोपडा तालुक्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले असून त्यांना सौम्य लक्षणे असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.
कोविड-19 या विषाणूचा जे-1 हा व्हेरियंट अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणामध्ये पसरत असल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी भुसावळ तालुक्यातील कुर्हे पानाचे येथे कोरोनाचा जिल्ह्यातील पहिला रूग्ण आढळून आला होता. त्याच्यावर उपचार करून बरा झाल्याने या रुग्णाला घरी पाठविण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले होते.
चोपडा तालुक्यातील दोन महिलांना कोरोनाचा संसर्ग आढळून आला आहे. या दोन्ही महिलांवर चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात विलगीकरण करून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, या दोन्ही महिलांना सौम्य लक्षणे असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. कोविडच्या संसर्गापासून कुणी घाबरू नका, मात्र लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका असेही प्रशासनाने आवाहन केले आहे.