भुसावळ : रेल्वेच्या पीओएच कारखान्यातून आठ लाखांची महागडी पॉवर केबल चोरी प्रकरणी भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाच्या हवालदारासह तिघांना अटक करण्यात आली होती तर या प्रकरणात आता नव्याने एका आरोपीला अटक करण्यात आल्याने अटकेतील आरोपींची संख्या चार झाली आहे. कुणाल लक्ष्मण मोरे (19, महादेव मंदिराजवळ, कंडारी, ता.भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दरम्यान, केबल चोरीनंतर ती विकून आलेल्या रकमेतील अर्धा हिस्सा हवालदार शशिकांत सुरवाडे याने ठेवल्याने त्यासदेखील या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले होते तर संशयिताला रेल्वे सुरक्षा बलाच्या आयुक्तांनी निलंबित केले असून त्याच्यासोबत कर्तव्यावर असलेल्या यादव नामक कॉन्स्टेबललाही निलंबित करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भुसावळातील रेल्वेच्या पीओएच कारखान्यातून सात लाख 94 हजार 227 रुपये किंमतीची 1604 किलो पॉवर केबल चोरीला गेल्याचा प्रकार 15 ते 16 डिसेंबरदरम्यान उघडकीस आला होता. याप्रकरणी संशयित सचिन उत्तम तायडे (25, महादेव टेकडी, हनुमान मंदिर कंडारी, ता.भुसावळ), राहुल रतन मोरे (23, महादेव टेकडी, हनुमान मंदिर कंडारी, ता.भुसावळ) व आरपीएफचे हवालदार शशिकांत गणपत सुरवाडे (57, स्वामी विहार, भुसावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. संशयिताना भुसावळ रेल्वे न्यायालयात हजर केले असता 24 पर्यंत आरपीएफ कोठडी सुनावण्यात आली.
अटकेतील तीन्ही आरोपींचा सुरक्षा यंत्रणेने जवाब नोंदवल्यानंतर त्यात पुन्हा एका आरोपीचे नाव समोर आल्याने त्यास अटक करण्यात आली. कुणाल लक्ष्मण मोरे (19, महादेव मंदिराजवळ, कंडारी, ता.भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.



