भर थंडीत अंध व अपंग बांधवांना दिली मायेची ऊब : वर्धापनदिनानिमित्त केले ऊबदार ब्लॅंकेट वाटप : स्नेहदीप महिला संस्थेचे कौतुकास्पद कार्य :


भुसावळ – येथील स्नेहादिप निराधार महिला आश्रमाच्या वर्धापनदिना निमित्ताने आज ७ डिसेंबर रोजी स्थानिक लीलाई मंगल कार्यालया येथे अंध व अपंग बांधवाना उबदार ब्लॅंकेट वाटप करण्यात आले .
डिसेंबर महिन्यात थंडीचे प्रमाण जास्त असते अश्या कडाक्याच्या थंडीपासून निराधार अंध व अपंग बंधू भगिनींचा सुद्धा बचाव व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून संस्थेने कांबळ वाटप केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन आरती चौधरी
होत्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात आरती चौधरी यांनी सांगितले की अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात कमी अधिक प्रमाणात असतात, पण त्यावर मात करून पुढे जायचे असते. भगवान श्रीकृष्णाला माता कुंतीने अडचणींचे वरदान मागितले होते. कारण संकटात, अडचणीत भगवंताचे स्मरण होईल, तसेच आपणही संकटात अडचणीत, देवाचे स्मरण ठेवा, आमचे मदतीचे हात कायम तुमच्या बरोबर आहेत व राहतील असे आश्वासनही अंध व अपंग बांधवांना दिले .
यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष राजेश पाटील, गोपाळ अग्रवाल, व डॉ. भोलाणे स्वाती भोळे, संजय पाटील, खानदेश अंधकल्याण संस्थेचे मानद अध्यक्ष डाॅ. बाळू पाटील, व पराग भोळे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ऊबदार कांबळ (ब्लँकेट) वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रतन पाटील, सुरेश पाटील, जागृत पाटील यांनी सहकार्य केले..
या प्रसंगी नांदुरा, मलकापूर, जळगाव,बुलढाणा चीनावल, फेकरी, व भुसावळ चे अंध निराधार बांधव उपस्थित होते तर पोलीस पाटील मधुकर पाटील यांनी यावेळी अन्नदान केले.