वरणगांवात भागवत सप्ताहाची उत्साहात सांगता

वरणगांव : प्रतिनिधी
आद्यकवी महर्षी वाल्मीक जयंती निमित्त येथील कोळी वाड्यात श्रीमद् भागवत पारायण कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते . या सप्ताहाची शनिवारी उत्साहाने महाप्रसाद, दिंडी सोहळा व रात्री काल्याचे किर्तनाने सांगता झाली .

आद्यकवी महर्षी वाल्मीक जयंती निमित्त शहरातील कोळी वाडा येथे २८ ऑक्टोंबर ते ४ नोव्हेंबर पर्यंत श्रीराम कथा, पारायण व अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते . श्रीमद् भागवत कथेचे हभप . महंत देवेंद्रजी महाराज माय सांगवीकर यांनी वाचन केले . तर दैनंदिन हभप . ज्ञानेश्वर महाराज (पुनगांव ), शाम महाराज ( उटखेडा ), रितेश महाराज ( कुंड ), मोहीनीताई महाराज ( सिरसोदा ), गजानन महाराज (भोलाणेकर ), रेखाताई महाराज ( मुक्ताई नगर ), कन्हैया महाराज ( शेंदुर्णी ) यांचे सुश्राव्य किर्तन झाले व शेवटच्या दिवशी हभप देवेंद्रजी महाराज यांच्या काल्याचे कीर्तनाने श्रीमद् भागवत पारायण कथेची सांगता झाली . तत्पूर्वी महाप्रसाद व सांयकाळी मोठ्या उत्साहाने दिंडी सोहळा पार पडला . श्रीमद् भागवत पारायण कथा सप्ताहासाठी महर्षी वाल्मीकी जयंती उत्सव समिती व सर्व समाज बांधवांनी परिश्रम घेतले .

मिरवणूक ऐवजी सप्ताहाचे केले जाते आयोजन

आद्यकवी महर्षी वाल्मीक जयंती उत्सवा निमित्त समाज बांधवांनी मिरवणूकीतील डिजे अथवा इतर बँड पथकावर होणारा वायफळ खर्च टाळून श्रीमद् भागवत पारायण कथेचे आयोजन केले जात आहे. यामुळे नवयुवक तरुण, महिला व समाज बांधवांमध्ये दरवर्षी चैतन्याचे वातावरण निर्माण होत असल्याने श्रीमद् भागवत पारायण कथा श्रवणाचा शहरातील सर्व समाजबांधवांनी लाभ घेतला .