भुसावळात नवदुर्गा विसर्जन उत्साहात व शांततेत संपन्न : वाल्मिक नगरचे भवानी मंडळ ठरले मिरवणुकीचे आकर्षण :उज्जेन येथील महाकाल पथकाच्या चित्तथरारक दृश्याने भुसावळकरांचे लक्ष वेधले :

भुसावळात नवदुर्गा विसर्जन उत्साहात व शांततेत संपन्न : वाल्मिक नगरच्या भवानी मंडळ ठरले मिरवणुकीचे आकर्षण : चित्तथरारक दृश्याने भुसावळकरांचे लक्ष वेधले :
भुसावळ : शहरात नवरात्रोत्सव सांगता प्रसंगी दुर्गा मातेला भावपुर्ण श्रद्धेने विधीवत पूजन करून साश्रू नयनांनी भाविकांनी दिनांक २५ रोजी डीजेच्या तालावर वाजत गाजत नाचून गरबा सादर करून मिरवणूक काढून निरोप दिला.
शहरातील विसर्जनाच्या मिरवणुकीत एकूण ३७ दुर्गाोत्सव मंडळांनी सहभाग नोंदविला.
विसर्जन मिरवणुकीला संध्याकाळी सहा वाजता सुरूवात झाली. रात्री १० वाजेपर्यंत वाद्य वाजविण्यास परवानगी देण्यात आल्याने १० वाजता विसर्जन मिरवणूकीत असलेल्या मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी वाद्य बंद केली.
शहरातील नृसिंह मंदीरापासून विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली. येथे शहरातील गंगाराम प्लॉट भागातील नवदुर्गा मंडळाची मिरवणूक संध्याकाळी पाच वाजता आली होती मूर्तीची पालिका व पोलिस प्रशासनातर्फे पूजा, आरती करण्यात येऊन या मंडळाच्या वाहनाला पहिला क्रमांक देण्यात आला. या मंडळानंतर मात्र सहा वाजेनंतर दुर्गा मंडळे नृसिंह मंदीराजवळ येऊ लागली. शहरातील बहूतांश मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी पाच वाजेनंतरच विसर्जन मिरवणुकीला सुरूवात केली. त्यामुळे जवाहर डेअरी, अप्सरा चौक भागात संध्याकाळी सात वाजेनंतरच दुर्गा मंडळे येऊ लागली होती.


मिरवणुकीत देवीभक्त मोहन बारसे यांचे वाल्मिक नगरातील भवानी मंडळ आकर्षण ठरले . रूही देवीची भव्य दिव्य मूर्ती सह मिरवणुकीत उज्जेन येथील महाकाल पथकाने अतिशय चित्तथरारक विविध दृश्ये सादरीकरण केले .यात नदीवर आरूढ शिवपार्वती, भोलेनाथच्या पुढे नाचणारी अंगाला राख फसलेली भुते यांनी जय महाकाल च्या जयघोषात विविध कला सादर केल्या .वाल्मिक नगर सह शहरातील नागरिकासह बघ्यांनी एकच गर्दी केली तर जय लेवा गृपची कालिका देवी , व अलंकार नवदुर्गा मंडळा च्या महिला कार्यकर्त्यांनी आई एकवीरा देवीवर आधारित सुंदर कोळी नृत्य मिरवणुकीत सादर करून दाद मिळवली .तसेच अनेक मंडळाच्या मोठमोठ्या 15 ते 20 फुटाच्या सुबक व सुंदर दुर्गा देवी मूर्ती आकर्षित होत्या.
दुर्गा विसर्जन तापी नदीवर करण्यात येत असल्याने पालिकेच्या माध्यमातून नदी किनारी फोकस लावण्यात आले होते. तसेच नदीवर आपत्ती व्यवस्थापन पथकाची नियुक्ती केली होती. पोलिस प्रशासनातर्फे सुद्धा एक बोट नदीपात्रात ठेवली होती, इमजर्न्सी काम पडल्यास बोटीचा उपयोग केला जावा यासाठी ही बोट ठेवली होती. शहरात विविध भागात सुध्दा पालिकेतर्फे फोकस लावण्यात आले होते. क्रेनचीही व्यवस्था केली होती.

मोठ्या मशीदीजवळ पोलिसांतर्फे सिग्नल यंत्रणा कार्यान्वीत केली होती. यावेळी मशीद ताडपत्रीने झाकण्यात आली होती.
मशीदीसमोरील चौकात दुर्गा मंडळ आल्यावर तेथे एक गाणे अथवा आरती म्हटली जाते, ते झाल्यावर लगेच हिरवा सिग्नल झाल्यावर त्या मंडळाला पुढे जाण्याच्या सूचना केल्या जातात. भुसावळ येथील हा सिग्नल पॅटर्न पोलिसांतर्फे जिल्हाभरात राबविण्यात येणार आहे.
दरम्यान ज्या मंडळांनी मिरवणूकीत सहभाग घेतला नाही त्यांनी त्याच्या मंडळाच्या दुर्गा देवीच्या मुर्ती विसर्जन करण्यासांठी थेट नदीवर घेऊन गेले .तर काही मंडळानी त्यांच्या मोठ्या मुर्ती या थेट वाघूर धरणावर तसेच हतनूर धरणावर घेऊन गेले. तेथे असलेल्या नदी पात्रातील पाण्यात मुर्तीचे विसर्जन केले. यावेळी
मुख्य मिरवणूक मार्गावर नृसिंह मंदिर ते स्टेशन रोडवरील अमर स्टोअर्स पर्यतच्या मार्गाला जाडणारे १९ उपरस्ते विसर्जन मिरवणूकीच्या पार्श्वभुमीवर बॅरेकेट लावून बंद केले होते. त्यात नृसिंग मंदीराकडून तेली मंगल कार्यालयाकडे जाणारा, टोपनदास यांच्या दुकानाजवळील रस्ता, शाळा क्रमांक पाच कडे जाणारा रस्ता, भास्कर मार्केट, शनि मंदीर वॉर्डाला जोडणारे तीन मार्ग, अप्सरा चौकातून विठ्ठल मंदीर वॉर्डाला जोडणारा मार्ग, गणेश मॉलपासून शनि मंदीर वॉर्डला जोडणारा वखार मार्ग, मरिमाता मंदीराच्या बाजूचा, व्हीएम वॉर्डाला जोडणारा रस्ता, जामा मशीद लक्ष्मी चौकातून राम मंदिर वॉर्ड व खाल्लमा दर्गा भागाला जोडणार्‍या दोन्ही उपरस्ते, सराफ बाजारातून ओसवाल पंचायती वाडा, भजे गल्लीला जोडणार रस्ता, मॉडर्न रोडपासून चिरा गल्लीला जोडणारा रस्ता, जनता टॉवर पासून इस्कॉन मुरलीधर मंदिराला जोडणारा रस्ता सुध्दा प्रशासनाकडून बॅरेकेट लावून बंद केले होते.
दुर्गा विसर्जन शांततेने व उत्साहात होण्यासाठी डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. विसर्जन मिरवणूकीत पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, सहायक निरीक्षक हरीष भोये, अनिल मोरे यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड यांचा बंदोबस्त तैनात होता.