मालेगावचे निलेश कुलकर्णी यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार :नाशिकच्या ज्ञानसाधना बहुउद्देशीय विकास संस्थेचा उपक्रम:


मालेगाव, ता. १५ : येथील राजस्थान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै. ल. रा. काबरा प्राथमिक विद्यामंदिरातील शिक्षक निलेश दत्तात्रय कुलकर्णी यांना नुकताच राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. नाशिकच्या ज्ञानसाधना बहुउद्देशीय विकास संस्थे तर्फे कै. विमल नारायण उपासनी यांच्या स्मरणार्थ दरवर्षी राज्यातील विविध गुणवंत शिक्षकांना हे पुरस्कार दिले जातात.
नाशिकच्या वसंतराव नाईक शैक्षणिक संकुलात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योगपती राजेश उपासनी होते. तर वित्त विभागाचे लेखाधिकारी व जनकल्याण रक्तपेढीचे संचालक गजानन देवचक्के, जयश्री उपासनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नियमित अध्यापना बरोबरच विविध परीक्षा व उपक्रमातुन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या राज्यातील ४५ शिक्षकांना यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे यात २० दिव्यांग शिक्षकांचा समावेश होता. यातील बरेच शिक्षक अंध होते. स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र, शाल व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. याप्रसंगी देवचक्के यांनी रक्तदाना बाबत समाजात जागृती निर्माण करण्यात शिक्षक महत्वाची भुमिका बजावु शकतात. याबाबत मी मार्गदर्शन करायला केव्हाही तयार आहे. राजेश उपासनी म्हणाले संस्थेच्या चांगल्या उपक्रमात मला सहभागी होता येते याचा मला निश्चितच आनंद होतो. पुरस्कार्थींच्या वतीने निलेश कुलकर्णी, मनिषा कापुरे यांनी मनोगत व्यक्त केले.ज्ञानसाधनाचे अध्यक्ष राजाराम गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अमोल अहिरे यांनी सुत्रसंचालन केले. पुरस्कार्थींचा परिचय प्रा. संतोष अग्निहोत्री, प्रा. अनिल भंडारे व महेश शुक्ल यांनी करुन दिला. सचिव प्रदीप जगताप यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी खजिनदार संगीता जाधव, सल्लागार अजित कुलकर्णी, कल्पना भामरे, निर्मला अहिरे, मोना हेमराजानी यांनी परिश्रम घेतले. निलेश कुलकर्णी यांचे राजस्थान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रघुवीर पाटोदिया, सचिव गोविंदनारायण तोतला, शाळा समिती चेअरमन महेंद्रकुमार मोदी तसेच काबरा विद्या मंदिराचे मुख्याध्यापक संजय शिंदे व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले.