भुसावळ, (प्रतिनिधी )-साकेगाव येथील सराफ फार्मसी कॉलेजच्या कार्यालयात मध्यरात्री धाडसी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. चोरट्याने कार्यालयासह प्राचार्यांच्या केबिनचे कडी-कुलूप तोडून १ लाख ५७ हजार ९८३ रुपयांची प्रवेश फीची रोकड लंपास केली. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांकडून जमा झालेली रोकड ज्या ड्रॉवरमध्ये ठेवण्यात आली होती, त्याच ड्रॉवरला चोरट्याने लक्ष्य केल्याने चोरीपूर्वी परिसराची पाहणी करण्यात आली असावी, असा संशय व्यक्त होत आहे. कॉलेजमध्ये सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. २ ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांकडून जमा झालेली १ लाख ५७ हजार ९८३ रुपयांची प्रवेश फी कार्यालय अधीक्षक धनराज तळले यांनी कार्यालयातील टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवली होती. सायंकाळी कार्यालय बंद करून त्यांनी वॉचमन विठ्ठल भारंबे यांना आवश्यक सूचना दिल्या आणि ते घरी गेले. दरम्यान, ३ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ६ वाजता वॉचमन भारंबे यांना कार्यालय तसेच प्राचार्यांच्या केबिनचे कडी-कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळले. त्यांनी तातडीने कार्यालय अधीक्षक तळेले यांना माहिती दिली. त्यानंतर तळेले यांनी शिपाई भरत रघुनाथ तळेले यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. पाहणी केली असता कार्यालयातील टेबलांचे लॉक तोडण्यात आले होते. कागदपत्रे व साहित्य अस्ताव्यस्त करण्यात आले होते. तसेच प्रवेश फीची रोकड ठेवलेल्या ड्रॉवरमधील संपूर्ण रक्कम गायब असल्याचे स्पष्ट झाले. प्राचार्यांच्या केबिनमधील ड्रॉवरही उचकटण्यात आला होता. चोरट्याने कार्यालयातील इतर साहित्य अस्ताव्यस्त केले असले तरी प्रवेश फीची रोकड ठेवण्यात आलेल्या विशिष्ट ड्रॉवरलाच लक्ष्य केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे चोरट्याला रोकड ठेवण्याच्या ठिकाणाची पूर्वकल्पना होती का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच संस्थेचे सचिव संजय पंडित इंगळे यांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यांच्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिवीक्षाधीन डीवायएसपी प्रशांत दरेकर यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू आहे. या धाडसी चोरीमुळे साकेगाव परिसरात खळबळ उडाली आहे.


