बियाणी एज्युकेशन ग्रुपचा शिक्षक दिवस उत्साहात साजरा.


भुसावळ – येथील बियाणी एज्युकेशन ग्रुप तर्फे बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये नुकताच शिक्षक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी बियाणी मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून बियाणी ग्रुपच्या सचिव डॉ. संगीता बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात शिक्षकांनी सुंदर असे समूह नृत्य,गीत गायन,विनोदी नाटिका इत्यादी उत्कृष्टपणे सादर करीत आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले.उत्कृष्ट सादरीकरण केलेल्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक असलेल्या गटांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. शिक्षकांनी सादर केलेल्या देशभक्तीपर,सामाजिक तसेच विनोदी नाटिका,समूह नृत्याने मान्यवर तसेच प्रेक्षक भारावून गेले होते.
या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे,भुसावळचे प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट मुकेश अग्रवाल, बियाणी गृपच्या सचिव डॉ.संगीता बियाणी, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर स्मिता बियाणी उपस्थित होते.गोपाल ठाकूर,राजीव पारीख,संजय लाहोटी,गोविंद हेडा उपस्थित होते. परीक्षक म्हणून रुपा अग्रवाल,स्नेहा लड्डा हे होते.डॉ. मुस्कान बियाणी व त्रिशा पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
महेश वाघमोडे यांनी बियाणी एज्युकेशन ग्रुप हा शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोलाची भूमिका बजावत असल्याचे गौरवोद्गार काढले तसेच शिक्षकांनी दाखवलेल्या कलागुणांचे कौतुक केले. मुकेश अग्रवाल यांनी संस्थापक स्व.मामाजींच्या आठवणींना उजाळा देत बियाणी एज्युकेशन ग्रुपचे छोट्याशा रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. शिक्षण क्षेत्रात बियाणी एजुकेशन ग्रुप हा अग्रेसर असून या मार्फत भुसावळ शहरातून देशाला मोठे प्रशासन अधिकारी मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली. बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या सचिव डॉ.संगीता बियाणी यांनी यास दुजोरा देत बियाणी एज्युकेशन ग्रुप हा विद्यार्थ्यांची उत्कृष्ट जडणघडण करीत देशासाठी शिस्तप्रिय व संस्कारक्षम नागरिक निर्माण करीत राहील याची हमी दिली.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या विविध संस्थांचे सर्व प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
आभार प्रदर्शन बियाणी मिलिटरी स्कूलचे प्राचार्य डी एम पाटील यांनी केले.