वाचनालयाकडे येणारी पावले वाढली पाहिजेत : डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांचे प्रतिपादन : सार्वजनिक वाचनालयात ग्रंथ प्रदर्शन

भुसावळ – व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी वाचन आवश्यक आहे. वाचनामुळे आपली विचार करण्याची क्षमता वाढत जाऊन आपण मानसिकरित्या सक्षम होत जातो. त्यामुळे आधुनिक काळात वाचनाची विविध साधने उपलब्ध असली तरी वाचनालयाकडे येणारी पावले वाढली पाहिजेत, असे प्रतिपादन भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी केले.

भुसावळ येथील डीएस हायस्कूललगत असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या 153 व्या वर्धापनदिनी आयोजित ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी के. नारखेडे विद्यालयाचे प्राचार्य नितीन किरंगे, म्युनिसिपल हायस्कूलचे मुख्याध्यापक ललित फिरके, बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील, वाचनालयाचे ग्रंथपाल नितीन तोडकर यांची उपस्थिती होती. प्रारंभी दीपप्रज्वलन करून सरस्वती मातेच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांच्या हस्ते फीत कापून ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविकात ग्रंथपाल नितीन तोडकर यांनी वाचनालयाचा इतिहास सांगून वाचनालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. डीवायएसपी कृष्णात पिंगळे हे नुकतीच एलएलबी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा सहृदय सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. जगदीश पाटील यांनी तर आभार सहाय्यक ग्रंथपाल अवधूत दामोदरे यांनी मानले. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष हिंमत ठाकूर (मुन्नाभाऊ), संचालक हरीश पाटील, मिलिंद भारंबे, कोटेचा महाविद्यालयातील प्रा. आर.एच. पाटील, भुसावळ गट साधन केंद्रातील विषय तज्ज्ञ संजय गायकवाड, प्रसाद काळवीट, रमेश पाटील, सुवर्णा बोरसे, अनिल गुजराथी, राजेश मोरे, राजाराम डोमसे, विनोद हासे, वाचनालयाचे सहाय्यक ग्रंथपाल अवधूत दामोदरे, सेवक होनाजी चौधरी यांच्यासह वाचकांची उपस्थिती होती.

तीनदिवशीय कार्यक्रम – सार्वजनिक वाचनालयात आयोजित तीनदिवशीय ग्रंथ प्रदर्शनात सुमारे पाचशेच्या वरून ग्रंथ ठेवण्यात आले असून ग्रंथालयात विविध प्रकारची हजारो दुर्मिळ पुस्तके उपलब्ध आहेत. वाचकांनी याचा लाभ घ्यावा. तसेच या तीन दिवसात भुसावळ येथील के. नारखेडे विद्यालय व म्युनिसिपल हायस्कूलमध्ये जाऊन वाचनालय आपल्या शाळेत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात शिक्षक व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल नितीन तोडकर यांनी केले आहे.