भुसावळ – रेल्वे प्रवासात महिला प्रवासी झोपल्याची संधी साधून भुसावळ जंक्शनवरून गाडी सुटली असता, चोरट्याने खिडकीतून हात आत टाकत मंगळसूत्र चोरले. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्यावर उत्तर प्रदेशातील दोन्ही भामट्यांच्या मुसक्या रेल्वे सुरक्षा बलासह लोहमार्ग पोलिसांनी आवळल्या. त्याच्याकडून चोरलेले मंगळसूत्र जप्त केले आहे. सावन श्रवन कोहली (वय २९, रा. खानपूर कला, मजरा यहियापूर, केराना, जि. शामली, उत्तरप्रदेश) व राजेश कृष्णकुमार चौहान (वय २८, रा. बिरालीयान, मजरा यहियापूर, झिंझाणा, केराना, जि. शामली,उत्तर प्रदेश) अशी अटकेतील संशयीतांची नावे आहे. दुरंतो एक्स्प्रेसने २० एप्रिल या दिवशी अलिशा सोहन चावेर (रा. बेजनबाग, नागपूर) मुंबई-नागपूर असा प्रवास एस-१ या डब्यातील ३६ नंबरच्या सीटवरून करीत होते.
भुसावळ जंक्शन आल्यावर त्यांना झोप लागली. हीच संधी साधन संशीताने त्यांच्या गळ्यातील ५५ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र लांबवले होते. दुसर्या घटनेत सीमा चंद्रशेखर सहारे (रा. दुर्गापूर, जि. चंद्रपूर) या दि. २० एप्रिल रोजी देवळाली ते नागपूर असा प्रवास सेवाग्राम एक्स्प्रेसच्या एस- ५ या डब्यातील सीट ४४ प्रवास करीत असताना त्यांच्या गळ्यातील ५४ हजारांचे मंगळसूत्र लांबवले. दोन्ही गुन्हे भुसावळ लोहमार्ग पोलिसांत दाखल झाला. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित पुन्हा रेल्वे स्थानकावरील पार्सल ऑफिसजवळ आल्यावर त्यांना अटक केली. संशीतांना न्यायालयाने दि. २२ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन्ही संशयितांच्या घरातून मंगळसूत्र जप्त केले. ही कारवाई लोहमार्ग पोलिस निरीक्षक विजय घेरडे, रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक आर. के. मीना यांच्या मार्गदर्शनाखाली लोहमार्ग उपनिरीक्षक संजय साळुंके, जगदीश ठाकूर, धनराज लुले, अजीत तडवी, दिवाणसिंग राजपूत, रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक तर्डे, महेंद्र कुशवाह, विनोद रावल, इम्रान खान यांनी केली.



