भुसावळ : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीच्या चौकशीसाठी बोलावून त्रास देण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सोमवारी रास्ता रोको आंदोलन करीत तीव्र निदर्शने केली. भाजपाकडून केंद्रासह राज्यात ईडीचा गैरवापर करून राष्ट्रवादीच्या नेत्यांसह विरोधकांना त्रास देण्याचा प्रकार सुरू झाल्याचा आंदोलकांनी केला. यावेळी भुसावळ तहसील कार्यालयावर मोर्चा नेत तहसीलदार दीपक धीवरे यांना कापूस भेट देवून पांढर्या सोन्याला दरवाढ देण्याची मागणी करण्यात आली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
शेतकर्यांच्या कापसाला 15 हजार रुपये हमीभाव द्यावा, शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानाची त्वरीत भरपाई द्यावी, विरोधकांनी आवाज उचलताच त्यांचा आवाज दाबण्यासाठी ईडीचा गैरवापर करण्याचा सपाटा केंद्रासह राज्यातील भाजपा सरकारने अवलंबवल्याचा यावेळी निषेध करण्यात आला. अवकाळी पावसात झालेल्या गारपीटीमुळे बळीराजाचे कंबरडे मोडल्यानंतरही त्यांना मदत मिळत नाही, पांढर्या सोन्याला भाव नाही, बेरोजगारीने जनता त्रस्त असून या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने रास्ता रोको करीत तहसील प्रशासनाला निवेदन दिले.

ईडीचा गैरवापर करीत जयंत पाटील यांना मनस्ताप
केंद्रातील व महाराष्ट्रातील भाजप सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करून नेहमी केंद्र सरकार तथा महाराष्ट्र सरकारच्या भाजपशासीत प्रशासनाचा सत्तेचा गैरवापर सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडी चौकशीसाठी बोलावले जात असून सरकारचे विरोधक असलेल्यांना विनाकार त्रास दिले जात असून कोणतेही पुरावे नसताना सरळ कार्यवाही करण्याचा डाव भाजप शिंदे गटाच्या माध्यमातून राज्यात खेळला जात असल्याचा आरोपही रवींद्र पाटील यांनी केला.
आंदोलन प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अतुल चव्हाण, विधानसभा क्षेत्र प्रमुख महेश सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील, पृथ्वीराज पाटील, विलास पाटील, ओबीसी सेल शहराध्यक्ष निलेश कोलते, तालुका कार्याध्यक्ष आकाश कुरकुरे, जिल्हा चिटणीस धर्मराज तायडे, कुर्हा-वराडसीम गटप्रमुख लक्ष्मण सपकाळे, तालुका उपाध्यक्ष प्रदीप कोळी, साकेगाव-कंडारी गटप्रमुख निलेश जाधव, सलीम तडवी, रुपेश बाविस्कर, मयूर मेढे, लल्ला मोरे, गणेश पाटील,विशाल नारखेडे, राहुल बिराडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


