भुसावळात किराणा व्यावसायीकाकडे धाडसी घरफोडी : 32 हजारांची रोकड लंपास –


भुसावळ : शहरात चोर्‍या-घरफोड्यांचे सत्र कायम असून गुन्हे उघडकीस येत नसल्याने नागरीक धास्तावले आहेत. शहरातील गोकुळ नगरातील किराणा व्यावसायीक कैलास रमेश इंगळे (38) हे परीवारासह बाहेरगावी गेल्याने घराला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधत 32 हजारांची रोकड लांबवली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात शनिवारी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.

पूजा कॉम्प्लेक्सच्या मागे गोकुळनगर असून या परीसरात किराणा व्यावसायीक कैलास रमेश इंगळे (38) हे परीवारासह वास्तव्यास आहेत. उन्हाळी सुट्यांमुळे कुटूंब रावेर तालुक्यातील तासखेडा येथे आई-वडिलांना भेटण्यासाठी गेल्याने घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. 11 ते 13 मे दरम्यानच्या मध्यरात्री चोरट्यांनी मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून बेडरूममधील लाकडी कपाटातून 32 हजारांची रोकड लांबवली. हा प्रकार शनिवार, 13 मे रोजी दुपारी शेजार्‍यांना घराचे कुलूप तुटलेले दिसताच त्यांनी इंगळे यांना माहिती दिली व त्यानंतर परीवारातील सदस्य शहरात दाखल झाले असता घरफोडीचा प्रकार उघडकीस आला.


बाजारपेठ पोलिसांना माहिती कळवल्यानंतर प्रभारी निरीक्षक गजानन पडघण व बाजारपेठ पोलिसांनी घरफोडीची माहिती घेतली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात कैलास रमेश इंगळे यांनी शनिवारी फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार सुनील जोशी करीत आहेत.